शेतकऱ्यांनी स्वत:चे सोयाबीन बियाणे राखून ठेवावे; कृषि विभागाचे आवाहन

अभय कुळकजाईकर
Thursday, 29 October 2020

शेतकऱ्यांनी आपल्या गावासाठी गावाचे क्षेत्राएवढे (शंभर हेक्टरसाठी शंभर क्विंटल याप्रमाणे) प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी स्वत:कडील चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. जेणेकरुन खरीप २०२१ मध्ये सोयाबीन बियाणे दुकानावरुन खरेदी करावी लागणार नाही. पुढील हंगामाकरीता बियाण्यांची टंचाई भासणार नाही. तसेच सोयाबीन बियाणे उगवणीच्या तक्रारीसुध्दा येणार नाहीत.

नांदेड - जिल्ह्यातील ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस सुरु झाल्याने सोयाबीन पीक शेतात काढणी अभावी उभे होते. कापणी करण्यात आलेले सोयाबीन मळणी अभावी शेतात उंच जागेवर गंजीच्या स्वरुपात झाकुन ठेवलेले आहे. या सर्व बाबींवरुन पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे राखून ठेवण्यात काही अंशी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापुर्वी केली आहे, अशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नांदेड जिल्हयात ऑक्टोबर महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना सूचना दिल्याने लवकर येणाऱ्या वाणांची शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापुर्वी केली आहे. या सोयाबीन बियाणांची प्रत चांगली आहे. मळणी केल्यानंतर बियाणे सरळ पोत्यात न भरता तत्पुर्वी दोन ते तीन दिवस ताडपत्रीवर किंवा स्वच्छ खळे करुन सावलीमध्ये वाळवावे. वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्युट बारदाण्यामध्ये भरावे. 

हेही वाचा - कोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर! परभणीच्या सराफा बाजारातील चित्र
 

६० किलोपर्यंत बियाणे साठवावे
पोत्यामध्ये साधारणपणे ६० किलोपर्यंत बियाणे साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवणूक करण्यात येऊ नये. बियाणे साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्यांची थप्पी सात पोत्यापेक्षा उंच जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक ही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करु नये. बियाणे साठवणूक करण्यापुर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळया किंवा जुने पोते इत्यादी अंथरुन त्यावर बियाण्यांची साठवण करावी. शेतकऱ्यांनी स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबीनची तीन वेळा (साठवणूक, विक्री दरम्यान, पेरणीपुर्वी) उगवण क्षमता चाचणी करुनच पेरणी करावी.

चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे ठेवावे
शेतकऱ्यांनी आपल्या गावासाठी गावाचे क्षेत्राएवढे (शंभर हेक्टरसाठी शंभर क्विंटल याप्रमाणे) प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी स्वत:कडील चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. जेणेकरुन खरीप २०२१ मध्ये सोयाबीन बियाणे दुकानावरुन खरेदी करावी लागणार नाही. पुढील हंगामाकरीता बियाण्यांची टंचाई भासणार नाही. तसेच सोयाबीन बियाणे उगवणीच्या तक्रारीसुध्दा येणार नाहीत.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संपावर, कामकाज ठप्प
 

पुढील हंगामासाठी बियाणे ठेवावे
सोयाबीनचे बाजारातील विक्रीचे दर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्री करण्याकडे कल आहे. परंतू आता विक्रीची घाई केल्यास पुढील हंगामासाठी हेच बियाणे जास्तीच्या दराने बियाणे म्हणून खरेदी करावे लागेल. यासाठी पावसापुर्वी काढणी, मळणी करुन ठेवलेले सोयाबीन असेल, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवावे.
- आर. बी. चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers should keep their own soybean seeds; Appeal to the Department of Agriculture, Nanded news