नांदेडला सचखंड गुरूद्वारात पहिला प्रकाश पर्व साजरा 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 19 August 2020

नांदेडला मुख्य सचखंड तख्त गुरुद्वारा श्री हजूरसाहेबमध्ये बुधवारी (ता. १९) श्री गुरु ग्रंथसाहेबांचा प्रथम स्थापना दिवस 'पहिला प्रकाश' हा पर्व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शीख भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी यांचे नांदेडला बुधवारी आगमन झाल्यानंतर त्यांचे शीख बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. 

नांदेड - येथील मुख्य सचखंड तख्त गुरुद्वारा श्री हजूरसाहेबमध्ये बुधवारी (ता. १९ ऑगस्ट) पहाटे श्री गुरु ग्रंथसाहेबांचा प्रथम स्थापना दिवस 'पहला प्रकाश' हा पर्व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शीख भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी यांचे नांदेडला बुधवारी आगमन झाल्यानंतर त्यांचे शीख बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. 

सुमारे ४१६ वर्षापूर्वी सन १६०४ मध्ये पहिल्यांदाच श्री गुरु ग्रंथ साहेबांची स्थापना करण्यात आली होती. त्या घटनेच्या स्मरणार्थ पहला प्रकाश पर्व देशभर साजरा करण्यात येतो. त्यामुळे नांदेडलाही मुख्य सचखंड गुरुद्वारा येथे पहिला प्रकाश पर्व उत्साहात साजरा करण्यात आला. 

हेही वाचा - नांदेड- बुधवारी सर्वात जास्त २३० कोरोना बाधित रुग्णांची नोंद 

मुख्य गुरूद्वारात झाली पूजा 
गुरुद्वाराचे कार्यकारी जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी पार पडले. यावेळी मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, भाई विजेंदरसिंघजी कपूर यांनी विविध सेवांचे संचालन केले. पहाटे चार वाजता दरम्यान श्री आदि गुरुग्रंथसाहेबांच्या हुकुमनामाचे वाचन झाले. त्यानंतर पाठ, कीर्तन, आरती, कथा आणि इतर कार्यक्रम पार पडले.

महाप्रसादाचे आयोजन
पहला प्रकाश पर्वाची अरदास झाल्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. आज पहला प्रकाश पर्व निमित्य गुरुद्वाराच्या लंगरमध्ये लंगर प्रसाद कार्यक्रम झाला. सणानिमित्त शीख भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष गुरिंदरसिंघ बावा, सचिव रविंदरसिंघ बुंगई यांच्यासह गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

हेही वाचलेच पाहिजे - अनुसूचित जमातीच्या अमंलबजावणीसाठी धनगर समाजाने असे केले आंदोलन...  

संत बाबा कुलवंतसिंगजी यांचे आगमन
दरम्यान, सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी यांचे बुधवारी (ता. १९) मुंबईहून नांदेडला विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी शीख बांधवांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. संत बाबा कुलवंतसिंगजी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी त्यांचे विशेष विमानाने नांदेडला आगमन झाले. यावेळी नवज्योत फाऊंडेशनच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर जागोजागी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुरूद्वारा बोर्डाचे पदाधिकारी, सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी यांनी मुख्य सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले आणि सर्वांचे आभार मानले. यावेळी संत बाबा बलविंदरसिंगजी, गुरुद्वाराचे बोर्डाचे सचिव रविंद्रसिंग बुंगई, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, अवतारसिंग पहरेदार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first Prakash Parva was celebrated at Sachkhand Gurudwara in Nanded, Nanded news