नांदेड जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

अभय कुळकजाईकर
Wednesday, 20 January 2021

नांदेड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतीची निवडणुक रद्द झाली होती.  तसेच १०६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. आता आगामी पाच वर्षासाठीचे सदस्य मतदारांनी निवडून दिले आहेत. आता सदस्यांसह सर्वांचेच सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. 

नांदेड - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १८) झाल्यानंतर आता गावच्या कारभाऱ्यांची निवड जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्य तसेच गावकऱ्यांचे आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. विविध पक्षांची नेतेमंडळी ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात असल्याचा दावा करत असली तरी सरपंच कुणाचा होणार? त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. सोडत झाल्यानंतर त्यानुसार पुढील व्युहरचना आखण्याचे पॅनेलप्रमुखांचे नियोजन आहे.
 
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतीची निवडणुक रद्द झाली होती.  तसेच १०६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. आता आगामी पाच वर्षासाठीचे सदस्य मतदारांनी निवडून दिले आहेत. आता सदस्यांसह सर्वांचेच सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - मध्यप्रदेशातील मुलास हिमायतनगरकरांचा आधार; भाकरीच्या शोधात भरकटलेला चिमुकला आईच्या कुशीत

नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार
ग्रामपंचायत निवडणुक होण्याआधी प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी सरपंच पदासाठी लिलाव झाल्याच्या घटना समोर आल्या तसेच काही ठिकाणी तक्रारीही झाल्या त्यामुळे राज्य सरकारने सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांवर झाला. काही ठिकाणचे किरकोळ अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडल्या. गावागावात पॅनेलप्रमुखांनी आपआपले पॅनल तयार करून चांगली लढत दिली. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासाठी तयारी सुरु, नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना चाचणी होणार

आरक्षण सोडतीकडे लक्ष
सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी दावे - प्रतिदावे करत आमच्याच पॅनेलचे वर्चस्व मिळवल्याचा दावा करण्यास सुरूवात केली. काही ठिकाणी काट्याची लढत झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षविरहित असल्यामुळे कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणत्या पक्षात हा विषय गौण असतो. मात्र, आता सरपंचपदाची निवडणुक होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच सरपंचपदाचे आरक्षण कुठल्या प्रवर्गाला सुटणार? याची चिंता लागली आहे. त्यानुसार त्या त्या गावात आता चर्चा सुरू झाली आहे.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पॅनलप्रमुखांचे सदस्यांवर लक्ष
दरम्यान, त्या त्या गावातील पॅनलप्रमुखांचा आणि सदस्यांचा गावकऱ्यांसह विविध पक्षातील नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांनी सत्कार करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर त्याची छायाचित्रेही सोशल माध्यमांसह प्रसारमाध्यमातूनही फिरत आहेत. मात्र, असे असले तरी सरपंचपद मिळेपर्यंत पॅनलप्रमुख देखील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. आपला समर्थक सदस्य दुसऱ्या गटात किंवा पॅनलमध्ये जाणार नाही, याची खबरदारी पॅनलप्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते घेत असल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Focus on drawing lots for Sarpanch post in Nanded district nanded election news