नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने आणखी नुकसान

अभय कुळकजाईकर
Monday, 12 October 2020

नांदेड जिल्ह्यात पुन्हा पडलेल्या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या वात्या झाल्या. उभे तसेच कापून ठेवलेल्या ज्वारी व सोयाबीनचे नुकसान झाले. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच पुरामुळे तब्बल एक लाखाहून अधिक हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले.

नांदेड - यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामधील अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यातून शेतकरी अद्याप सावरले नाहीत. तोच परतीच्या पावसाने पुन्हा रविवारी (ता. ११) दणका दिला. जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या पुन्हा पाऊस पडला. निवघा (ता. हदगाव) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सोमवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ९.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

नांदेड जिल्ह्यात पुन्हा पडलेल्या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या वात्या झाल्या. उभे तसेच कापून ठेवलेल्या ज्वारी व सोयाबीनचे नुकसान झाले. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच पुरामुळे तब्बल एक लाखाहून अधिक हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर शेतकऱ्यांनी शिल्लक असलेल्या सोयाबीन, ज्वारी या पिकांची कापणी करुन मळणी करत असताना रविवारी (ता. ११) पाऊस पडला. सोमवारी (ता. १२) देखील जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. 

हेही वाचा - हिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात

निवघा मंडळात अतिवृष्टी
निवघा (ता. हदगाव) मंडळात ८३.२५ मिलीमीटर एवढा पाऊस झाला म्हणजेच अतिवृष्टी झाली. सोमवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ९.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात ८७५.५० मिलीमीटरनुसार १०३.७१ टक्के पाऊस झाला आहे. रविवारच्या पावसामुळे वेचणीसाठी आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. 

कापलेल्या पिकांना मोडची शक्यता
यंदा सुरवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे पिके जोमात आली होती. त्यामुळे यंदा उत्पन्न चांगले येईल, या आशेवर शेतकरी होता. पण पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले. सष्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आक्टोंबर महिन्यात परतीचा पाऊस सुरू झाली. त्यामुळे जिल्ह्यात पावसामुळे उभे तसेच कापून ठेवलेली ज्वारी व सोयाबीन पूर्णपणे भिजल्याने त्याला मोड येण्याची शक्यता आहे. दरम्यान रविवारीनंतर सोमवारीही काही भागात जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे.   

हेही वाचलेच पाहिजे - सोमवारी ७४ अहवाल पॉझिटिव्ह, २३५ रुग्ण कोरोनामुक्त ः एकाचा मृत्यू 

रविवारी तालुकानिहाय झालेल्या पाऊस (मिलीमीटरमध्ये)

नांदेड - ४.३०, बिलोली - ८.४०, मुखेड - चार, कंधार - सात, लोहा - १९.१०, हदगाव - ३३.६०, भोकर - १५.३०, देगलूर - ६.६०, किनवट - १७.२०, मुदखेड - २.२८, हिमायतनगर - २.५०, माहूर - ०.४०, धर्माबाद - ०.५०, उमरी - ९.६०, अर्धापूर - ४.४०, नायगाव - दोन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Further damage due to return rains in Nanded district, Nanded news