किरायाच्या इमारतीतील जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात

प्रमोद चौधरी
Tuesday, 29 September 2020

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दीग्रसकर यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देवून किरायाच्या इमारतीत भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची माहिती मागितली आहे. कारण या इमारतींचे भाडे भरण्यासाठी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाला आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा शाळा जिल्हा परिषदेच्याच जवळच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार जिल्हा परिषद करत आहे.

नांदेड :  जिल्ह्यातील किरायाच्या इमारतीमध्ये भरविण्यात येत असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परिणामी या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न सध्या ऐरणीवर आला आहे. 
 
जिल्ह्यामध्ये बहुतांश शाळा किरायाच्या इमारतीमध्ये भरविल्या जात आहेत. या शाळांमध्ये असलेले वर्ग, विद्यार्थ्यांची संख्या आणि समायोजन करता येणाऱ्या जवळच्या शाळेचे नाव कळविण्याचे पत्र शिक्षणाधिकारी प्रशांत दीग्रसकर यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. कारण या इमारतींचे भाडे भरण्यासाठी अनेकदा आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा शाळा जिल्हा परिषदेच्याच जवळच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार जिल्हा परिषद करत आहे.

हेही वाचा - नांदेड- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा जोर ओसरला, सोमवारी २६३ रुग्ण कोरोनामुक्त, १५४ जण पॉझिटिव्ह
 
मात्र, या शाळा इतर ठिकाणी समायोजन केल्यास तेथील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची आबाळ होणार आहे. मुले शिक्षणापासून वंचित राहतील. शहरात इंग्रजी शाळांचे पेव खूप प्रमाणात आहे. पण मोलमजुरी करणारे, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांना परिसरातील जिल्हा परिषद शाळा हाच एकमेव पर्याय आहे. कारण मुलांना ने-आण करण्यासाठी पालक घरी नसतात आणि सोबतच शिक्षकाच्या समायोजनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या शाळांचे समायोजन करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षण सभापती संजय बेळगे, अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांना निवेदन दिले आहे. 

हे देखील वाचाच - Video - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस

दरम्यान, शिक्षण सभापती संजय बेळगे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच मुलांच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले आहे. शिष्टमंडळामध्ये राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, सुरेश दंडवते, संजय कोठाळे, विठ्ठल ताकबिडे, डी. एम. पांडागळे, बालाजी पांपटवार, सिद्धेश्वर मठपती, गौतम कसबे, बाळासाहेब मटके, धोंडीराज मुस्तापुरे, श्री. मुंडकर, सुधाकर वजिरगावे आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करू
जिल्ह्यामध्ये किरायाच्या इमारतीतील जिल्हा परिषद शाळांचे जवळील जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी यांनी घेतला आहे. मात्र, या शाळांचे समायोजन करण्यापूर्वी मुलांच्या हिताचाच विचार केला जाईल. 
- संजय बेळगे, शिक्षण सभापती-जिल्हा परिषद नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Future Of Zilla Parishad Schools In Rented Buildings Nanded News