Video - ऊसतोड कामगारांनी ऊसाचे एक टिपरुही तोडू नये - आमदार सुरेश धस

नांदेड - ऊसतोड संघटनेच्या संयुक्त चर्चासत्रात आमदार सुरेश धस.
नांदेड - ऊसतोड संघटनेच्या संयुक्त चर्चासत्रात आमदार सुरेश धस.

नांदेड - राज्य शासनाने ऊस तोड वाहतुकीच्या दरात भरीव वाढ करुन कामगारांचे हित जोपासणारा कायदा केल्याशिवाय एकही ऊस तोड कामगार साखर कारखान्यावर  न जाता असहकार आंदोलन सुरु करावे असे आवाहन  माजी राज्यमंत्री आ. सुरेशअण्णा धस यांनी केले आहे.

नांदेड येथे स्व.गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मुकादम व वाहतुकदार व महाराष्ट्र राज्य श्रमीक ऊस तोडणी मजूर संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २८) आयोजित करण्यात आलेल्या मुकादम संघटनेच्या संयुक्त चर्चासत्रात आमदार धस बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर होते. प्रमुख पाहूणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार अविनाश घाटे, भाजपाचे जिल्हा संघटन सचिव गंगाधर जोशी, ऊसतोड कामगार संघटनेचे नेते दत्तोपंत भांगे, तात्यासाहेब घुले पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे आदींची उपस्थिती होती.

साखर महासंघाकडून होतेय फसवणुक
ऊसतोड मुकादमांना मार्गदर्शन करताना आमदार धस म्हणाले, साखर महासंघाने आतापर्यंत ऊसतोड कामगार, वाहतुकदार, मुकादमांना बळीचा बकराच बनविला आहे. ऊस तोड कामगारांच्या हिताचा विचार न करता साखर कारखानदारांचेच हित जोपसाले आहे. राज्य शासनाने असंघटीत कामगाराप्रमाणे ऊस तोड कामगारांचे हित जोपासणारा कायदा करावा, ऊस तोड वाहतुकीच्या दरात दीडशे टक्के भाववाढ केलीच पाहिजे. कोरोना काळात ऊसतोड कामगारांचा ५० लाखांचा विमा काढल्याशिवाय एकाही कामगारांनी ऊस तोडण्यासाठी जावू नये असे आवाहन त्यांनी केले.

असहकार आंदोलनास सज्ज रहावे
ऊस तोड कामगार व मुकादमांनी संघटीतपणे साखर कारखानदारांना असहकार आंदोलन करण्यास सज्ज रहावे. ऊस तोड कामगारांच्या हिताचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडण्यास भाजपाने पुढाकार घेवून हे कामगारांचे असहकार आंदोलन छेडण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभरातील ऊस तोड कामगारांच्या हितासाठी भाजपाने कंबर कसली आहे. नाशिकपासून ते नांदेडपर्यंतच्या दौर्‍यांत मुकादमांशी चर्चासत्राचे आयोजन करुन आपल्या हक्काच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचा इशारा देण्यात येत असल्याचे आमदार धस यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत भाजपा आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. साखर कारखानदारांनी ऊसतोड कामगारांचे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी वेळप्रसंगी गुंडांचा वापर करतील. गुंडांच्या दबावाला बळी न पडता आपल्या न्याय हक्कासाठी संघटीतपणे सर्वांनी लढा दिला पाहिजे, असेही श्री. धस म्हणाले.

साखर सम्राटांनी केले दुर्लक्ष
साखर सम्राटांनी ऊस तोड कामगार, वाहतुकदार, मुकादमांच्या हिताचा आतापर्यंत कोणताच विचार केला नाही. त्यांची पिळवणूक करण्याचे धोरणच अवलंबिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण यांनी ऊस वाहतुकीच्या दरात ६२ टक्के एवढी भरीव वाढ केली होती. त्यानंतर गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७० टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली. वाढत्या माहागाईच्या काळात ही वाढ तुटपूंजी असल्यामुळे दीडशे टक्के भाववाढ मिळाल्याशिवाय ऊसाचे एक टिपरुही तोडू नका, असे आवाहन आमदार धस यांनी केले. मुकादम मंडळींनी साखर कारखान्याकडून ऊसतोड टोळ्या पुरविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम उचलली असेल तरीही घाबरु नका, जोपर्यंत वाहतुकीच्या दरात दीडशे टक्के वाढ मिळाल्याशिवाय एकाही साखर कारखान्यांना ऊसतोड टोळ्या पुरवू नका, असे आवाहन करुन ते म्हणाले, साखर कारखानदार आता गुंडांच्या टोळ्या पोसत आहेत. त्यांच्यामार्फत ऊसतोड कामगारांचा छळ सुरु झाला आहे. मुकादम मंडळींनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या टोळ्यांची पळवापळवी न करता आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी संघटीतपणे हा लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ऊसतोड कामगारांच्या पाठीशी - चिखलीकर
खासदार चिखलीकर यांनी अध्यक्षीय भाषणात साखर कारखानदारांनी ऊसतोड कामगारांचे हे आंदोलन चिडून टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्यास चोख उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा खासदार या नात्याने कामगारांचे संरक्षण करुन हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ऊसतोड कामगारांच्या पाठिशी भाजपाचे खासदार, आमदार, पदाधिकारी खंबीरपणे पाठिशी उभे आहेत.  कारखानदारांच्या गुंडांचा बंदोबस्त करण्यास आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे कामगारांनी न घाबरता आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com