पोलिसांसाठी गुड न्यूज : बदल्यांचा मुहूर्त स्वातंत्र्य दिनापर्यंत, फिल्डींगसाठी एक आठवडा

प्रल्हाद कांबळे
Friday, 7 August 2020

त्याची मुदत ता. ३१ जुलै रोजी संपल्याने आता पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आठवडाभर पुढे ढकलल्या आहेत.

नांदेड : पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांचा मुहूर्त आता वाढला असून ता. १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.  शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के पदल्या करण्यासाठी मंजुरी दिली होती. त्याची मुदत ता. ३१ जुलै रोजी संपल्याने आता पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आठवडाभर पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बदल्यांची बाशींग बांधून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांकडे फिल्डींग लावण्याची संधी मिळाली आहे. 

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाने सर्वप्रथम यंदाच्या या आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारच्या सर्वसाधारण बदल्या करायच्या नाहीत असे आदेश दिले होते. त्यानंतर ता. सात जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने ता. ३१ जुलैपर्यंत आपापल्या विभागातील सक्षम अधिकाऱ्याने एकूण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार १५ टक्के बदल्या कराव्यात अशा सूचना दिल्या. यावर पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी बदल्या करण्याच्या सूचनाबाबत पुन्हा एकदा ता. आठ जुलै रोजी विचारणा केली. गृह विभागानुसार ता. सात जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार पोलिस विभागाच्या बदल्या १५ टक्के यामध्ये कराव्यात असे सुचविण्यात आले आणि त्याची मुदत ता. १० ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आल्याचे पोलिस महासंचालकांनी पत्राद्वारे सूचित केले होते. 

हेही वाचा -  नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागन

आयपीएससह बदल्या अपेक्षीत 

यावर पोलिस महासंचालक कार्यालयाने पुन्हा एकदा विचारणा केली. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या अगोदर पोलीस महासंचालक कार्यालय, त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आणि त्यानंतर प्रत्येक पोलिस विभागाचे घटकप्रमुख यांनी करायचे असतात. त्या बदल्यात दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अशक्य आहे, त्यामुळे मुदत ता. १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची विनंती पोलिस महासंचालक कार्यालयाने ता. १३ जुलै रोजीच्या पत्राद्वारे केली होती. हा प्रस्ताव गृह विभागाने तयार केला. त्यावर अवल सचिव तुषार महाजन यांची स्वाक्षरी आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत गेली. त्यात भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा करण्यास हरकत नाही असे लिहिलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for the police: the moment of change until Independence Day a week for fielding nanded news