तुम्हीच सांगा, आमचे घरकुलाचे स्वप्न कसे पूर्ण होईल

प्रमोद चौधरी
Friday, 25 September 2020

प्रत्येकाला हक्काचे घर असावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. परंतु, अनेकांना या येजनेचा फायदा होत नसल्याने ‘तुम्हीच सांगा, आमचे घरकुलाचे स्वप्न कसे पूर्ण होईल’, असे म्हणण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.

नांदेड :  प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून १९९५-९६ पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, ही योजना कागदपत्रे गोळा करण्यातच व्यस्त असल्याने लाभार्थी त्रास्त झाले आहेत.

प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे, असे वाटते. प्रत्येक जण घर बांधण्याचे स्वप्न बघत असतो. मात्र, विविध कारणांमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. अशांसाठी शासनाची घरकूल योजना आहे. मात्र, आता ही घरकुल योजनाही मृगजळ ठरू पाहत आहे. तुटपुंज्या अनुदानात घरकूल बांधावे तरी कसे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर

विविध योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी अनुदान दिले जाते. मात्र, लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे. अलिकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सिमेंट आदी साहित्यामध्ये झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान ५०० चौरस फुट घर बांधकामासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे सार्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. अनेक लाभार्थ्यांचे घरकूल अपुर्णावस्थेत असल्याचे जिल्ह्यात दिसून येते. पहिला टप्पा बांधल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाते. परंतु अनेकांचे बजेट पहिल्या टप्प्यातच कोलमडून जाते. घरकुलाचे लाभार्थीही दारिद्र्य रेषेखाली आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक अंदाज घेऊनच घरकुलाचे बांधकाम करावे लागते. 

हे देखील वाचलेच पाहिजे - नांदेड - कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू

दुसऱ्या टप्प्यातच अडकते बांधकाम 
सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर घरकुलाला मंजुरी मिळते. बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम स्लॅबपर्यंत आल्यानंतर अनुदान मिळते. परंतु दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुसऱ्या टप्प्यातच अनेकांचे घरकूल अपुर्ण असल्याचे दिसून येते. या अडचणींवर मात करून तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानासाठी मात्र शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते.    

अनुदानात वाढ करावी
सध्या घरकुलासाठी मिळत असलेले एक लाख २० हजार अनुदान हे तुटपुंजे आहे. हल्ली बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे. विटा, रेती, मजुरी, सिमेंट आदीत झालेली वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान ५०० चौरस फुट घर बांधकामासाठी तीन लाखापेक्षा जास्त खर्च येतो. 
- यमुनाबाई सोनवणे, मजूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grants For Gharkul Scheme Should Be Increased Nanded News