धर्माबादेत कोरोनाचा कहर

सुरेश घाळे
Friday, 14 August 2020


कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे तालुक्यातील बन्नाळी येथील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच पाटोदा येथे एक, तेलंगणातील जवळा येथे एक, पिंपळगाव येथे दोन व शहरातील एका नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या अँटीजेन किटने तपासणी केल्यास एकूण २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

धर्माबाद, (जि. नांदेड) : तालुक्यात कोरोनाचा कहरच सुरू झाला आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी एकूण कोरोनाचे २२ रुग्ण आढळून आले असून, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता १३८ वर गेली असल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख एकबाल यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे तालुक्यातील बन्नाळी येथील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच पाटोदा येथे एक, तेलंगणातील जवळा येथे एक, पिंपळगाव येथे दोन व शहरातील एका नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी करण्यात आलेल्या अँटीजेन किटने तपासणी केल्यास एकूण २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -  भयमुक्त जगण्यासाठी हवे स्वातंत्र्य...
 

त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता १३८ वर गेली आहे. शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहरच सुरू झाला असूनही शहरातील दुकानदार व नागरिक कोरोनाचे अटी व नियम पायदळी तुडवून आपला व्यवसाय करीत आहेत. नागरिक खुलेआम फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहरच सुरू झाला असल्याची चर्चा शहरातील जनतेत सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी होत नाही. 

सदरील संपर्कातील नागरिक शहरात खुलेआम फिरत आहेत. परिस्थितीत आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर सदरील नागरिक येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी येत आहेत. तपासणी झाल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस येत आहेत; परंतु दरम्यानच्या काळात सदरील कोरोनाबाधित शहरातील अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याची खंत एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील नातेवाईक व मित्रपरिवारास कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी काहीच हालचाल करीत नाहीत.

जनतेनीही कोरोनाचे लक्षणे आढळून येताच कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य माहिती असताना सुद्धा येथील कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कोरोनाचा सुरू असलेला कहरच थांबविण्यासाठी शहरातील जनतेने व व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या अटी व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची काळाची गरज असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दत्तात्रय शिंदे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख एकबाल, मुख्याधिकारी श्रीमती नीलम कांबळे, गटविकास अधिकारी श्रीकांत बेळदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. वेणुगोपाल पंडित, डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. पूजा आरटवार, डॉ. शिरगिरे, डॉ. नागरगोजे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक बाबूराव केंद्रे, रुक्माजी भोगावार, सफाई विभागप्रमुख अशोक घाटे, मंडळ अधिकारी नामदेव माळोदे, तलाठी सहदेव बासरे व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Havoc Of Corona In Dharmabad, Nanded News