कन्टेनमेन्ट झोनमध्ये ‘हे’ समुपदेशन करणार... कोण ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील नागरिकांमध्ये भितिदायक वातावरण निर्माण होत असल्याने रुग्णाच्या परिवारासह शेजारच्या नागरिकांना मोठ्या मानसिक आधाराची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

नांदेड : कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना मानसिक आधार देवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सिडको नांदेड येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील नागरिकांमध्ये भितिदायक वातावरण निर्माण होत असल्याने रुग्णाच्या परिवारासह शेजारच्या नागरिकांना मोठ्या मानसिक आधाराची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. ही गरज लक्षात घेऊन कोव्हीड आजाराबाबत समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देण्याची जबाबदारी सहयोगी प्राध्यापकांना दिली आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दितील विवेकनगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर), जोशी गल्ली (सराफा होळी परिसर), शिवाजीनगर या क्षेत्रात कोव्हीड- 19 चे रुग्ण आढळून आल्यामुळे या क्षेत्रामध्ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून या कंटेनमेंट झोनमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून या झोनमध्ये सहयोगी प्राध्यापक दिवसातून वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांना धीर देवून अडचणीची माहिती घेतील. या अडचणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने त्या दूर करण्याची कार्यवाही करतील.

हेही वाचा - झेडपी मुख्यालयात आता मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी - कसे ते वाचा

या प्राध्यापकांची नेमणूक 

समुपदेशनासाठी महानगरपालिका हद्दीतील विवेकनगर येथे डॉ. एस. व्ही. जगताप, इतवारा डॉ. ए. टी. शिंदे, मिल्लतनगर डॉ. एफ. एम. सौदागर, जिजामाता कॉलनी (आनंदनगर परिसर) डॉ. एस. एस. पाईकराव, जोशी गल्ली (सराफा, होळी परिसर) डॉ. एन. के. वाघमारे, शिवाजीनगर डॉ. श्रीमती के. बी. गित्ते यांची नेमणुक करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

यापूर्वीच्या आदेशात देण्यात आलेल्या अटी व शर्ती जशास-तशा लागू राहतील. जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He will give counseling in the containment zone who will read it nanded news