
त्याला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले असल्याची माहिती मिळाली आहे.
लोहा (नांदेड) : तालुक्यातील शिवणी (जामगा) येथे सायकल अंगावर गेल्याच्या कारणावरुन भांडण झाले. भांडण सोडविण्यासाठी गावातील दलित युवक गणेश एडके गेला असता त्यांच्या डोक्यात मुख्य आरोपी विश्वनाथ आप्पाराव जामगे यांनी जोरदार कुऱ्हाडीचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले असल्याची माहिती मिळाली आहे.
अर्धापूरकरांनो सावधान; पांगरीत आढळले नव्याने कोरोनाचे दोन रूग्ण
याबाबत शिवाजी संभाजी दुधमल (वय २६ ) रा.जमगा शिवणी यांनी लोहा पोलिसात फिर्याद दिली असता आरोपी प्रल्हाद आप्पाराव जामगे, विश्वनाथ आप्पाराव जामगे, काशिनाथ आप्पाराव जामगे, आप्पाराव विश्वनाथ जामगे, सुदाम ( मंगु) यादोजी जामगे, दशरथ यादू जामगे, ज्ञानोबा विश्वनाथ जामगे, यादोजी विश्वनाथ जामगे सर्व जामगा शिवणी यांच्या विरोधात लोहा अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी शिवाजी संभाजी धुदमल यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की, माझा भाऊ सायकलवर जात असताना आरोपी बसवेश्वर बोमनाळे याने त्याच्या मोटर सायकलने धडक देऊन खाली पाडले. त्यामुळे फिर्यादीच्या भावास मार लागला. सदर मोटर सायकल चालकाच्या घरी जाऊन सांगत असताना फिर्यादी व त्याच्या चुलत्याला प्रल्हाद आप्पाराव जामगे, यांनी जातिवाचक शिवीगाळ करून थोड्यावेळाने नंतर वर नमूद सर्व आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातामध्ये काठी व गजाळी घेऊन फिर्यादी व त्याच्या चुलत्याच्या घरामध्ये घुसून काठी व लाथा बुक्यांने जखमीस मारहाण केली व घरांच्या भिंतीला लाथा मारून भिंत पाडली.
यानंतर यातील सर्व जखमी माराच्या भीतीपोटी घराबाहेर पळून आले. त्यामुळे गणेश एडके हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदरील प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे हे करीत आहेत. लोहा पोलीसांनी ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आरोपीच्या अटकेसाठी विविध दलित संघटनेचा लोहा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या व निषेध
जामगा शिवणी येथील दलित युवक गणेश एडके यांच्यावर व दलित (बौध्द) समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध लोहयात विविध दलित संघटना व पक्षांनी केला. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली व लोहा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. राज्यातील आघाडी सरकारचा निषेध केला. दलित बौध्दावरील होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच लोहा तालुक्यातील जामगा शिवणी येथील येथील गणेश एडके यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा लोहा शहर शनिवारी (ता. २७ ) बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांना निवेदन देण्यात आले आहे.