नांदेड जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी; पिकांचे नुकसान

अभय कुळकजाईकर
Wednesday, 16 September 2020

नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. जिल्ह्यातील मुखेड, देगलूर आणि बिलोली या तीन तालुक्यात पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. नांदेड शहर आणि परिसरातही पाऊस झाला. गेल्या चोवीस तासात बुधवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

नांदेड - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. १६) सर्वदूर पाऊस झाला. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्यातील कुंडलवाडी (ता. बिलोली), चांडोळा (ता. मुखेड), कंधार आणि करखेली (ता. धर्माबाद) या चार मंडळात अतिवृष्टी झाली. दरम्यान, देगलूर, बिलोली व मुखेड तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड शहरातही सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. दिवसभर हवामान ढगाळ होते. 

जिल्ह्यात मंगळवारी (ता. १४) काही तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, ज्वारी, तसेच फळपिके आडवी झाली आहेत. तर मुखेड तालुक्यात पुरात वाहून गेल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चोवीस तासात बुधवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोमवारी सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. 

हेही वाचा - परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक 
 
चार मंडळात अतिवृष्टी 

गेल्या २४ तासात जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात कुंडलवाडी (ता. बिलोली) मंडळात ७९.५० मिलीमीटर, चांडोळा (ता. मुखेड) मंडळात ९८.५० मिलीमीटर, कंधार मंडळात ८५, तर करखेली (ता. धर्माबाद) मंडळात ७६.५०मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सोयाबीन तसेच कापूस, ज्वारीला फायदा झाला. मात्र, मुखेड, बिलोली व देगलूर तालुक्यात कापूस, ज्वारी, केळी आदी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

शेती पिकांचे नुकसान 
सततच्या पावसामुळे मुखेड तालुक्यातील नदीकाठच्या भागातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच केळी, उसाचेही पुरामुळे नुकसान झाले आहे. मंगळवारी व बुधवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील नदी नाले वाहू लागले आहेत. शहरा भोवती असलेल्या सर्वच लहान नाल्यांना पूर आला आहे. तर हाळणी, इटग्याळ (पट्टी मुक्रमाबाद) येथे म्हैस व दोन बैल वीज पडल्यामुळे मृत्यु झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. यातच सकनूर येथील एका पोल्ट्री फॉर्मवर वीज पडल्याने जवळपास अडीचशे ते तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. 

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : बनावट नोटाप्रकरणी नागपूरमधून एकाला अटक 

तालुकानिहाय पडलेला पाऊस 

गेल्या २४ तासात बुधवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.                                   नांदेड - ०.८, बिलोली - २९, मुखेड - ५९.६०, कंधार - २६.६०, लोहा - १४, हदगाव - १.८०, भोकर - २३.७०, देगलूर - १८.६०, किनवट - ६.५०, मुदखेड - २.६०, हिमायतनगर - १४.७०, माहूर - ३.६०, धर्माबाद - ४७, उमरी - १०.८०, अर्धापूर - शून्य, नायगाव - २५.८०. मिलीमीटर. एकूण सरासरी - १८.१० मिलीमीटर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in four circles in Nanded district; Crop damage, Nanded news