
नांदेडकरांनी देखील पत्ते खेळणे, क्रिकेट, पब्जी, कॅरम खेळण्यासाठी एकत्र येत असल्यास वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यासह कुटुंबियांनादेखील कोरोनाचा धक्का बसू शकतो आणि या लहानशा चुकीचा परिणाम अख्या कुटुंबियांनादेखील भोगावा लागु शकतो.
नांदेड : वेळ घालवण्यासाठी मनोरंजन म्हणून कॅरम, पब्जी, पत्ते खेळणे यात काही चुकीचे नाही. मात्र, सध्या कोरोनाचे सावट सर्वांवर गोंगावत असल्याने दाटीवाटीने बसून हे खेळ खेळणे महागात पडू शकते. औरंगाबाद शहरात आढळलेल्या एकुण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण हे असेच खेळ खेळताना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न करताना आढळले. याचीच पुनरावृत्ती नांदेडमध्ये घडू नये, याची खबरदारी सर्वांनी घेतलेली बरी. छोट्याश्या चुकीचा परिणाम आपल्या कुटुंबियांनाही भोगावा लागू शकतो. तेंव्हा काळजी घेतलेली बरी.
मराठवाड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे. तसेच रुग्ण सध्या नांदेड शहरात वाढत आहेत.
हेही वाचा - वेदनादायक : उपचाराला पैसे नसल्यामुळे तरुणीची आत्महत्या
उन्हाच्या पहारी पत्ते खेळण्यासाठी गर्दी
शहरातील शेतकरी चौक (तरोडा नाका) कॅनॉलरोड परिसरात अनेकजण गावखेड्यातून मालवाहू चारचाकी गाड्या लावून गाडीला काम मिळण्याच्या प्रतिक्षेत असतात. दुसऱ्याबाजुला बिगारी कामगारदेखील कामाच्या शोधात बसलेले असतात. अनेकतास वाट बघूनदेखील कामाची कोणी विचारपूस करत नाही. दरम्यान, उन्हाच्या पहारी बाजुला असलेल्या बाभळीच्या झुडपात जाऊन मनोरंजन म्हणून पत्ते खेळण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येते.
हेही वाचा - नांदेडला कोरोनाचा धक्का अन् दिलासाही...
नांदेडकरांच्या जिवाला घोर
शेतकरी पुतळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर भाग्यनगर पोलिस ठाणे आहे. पोलिसांचा बंदोबस्त येथे असतो, तरीदेखील लोक एकत्र येऊन पत्ते कसे खेळतात, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. नांदेड शहरात सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे बाहेरुन आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. बाहेरगावाहून लपून चोरुन नागरिक शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेरुन येणाऱ्या रुग्णांमुळे नांदेडकरांच्या जिवाला घोर लागला आहे.