श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण संपर्क कार्यालयाचे शुभारंभ- संत बाबा बलविंदरसिंघ

प्रल्हाद कांबळे
Saturday, 2 January 2021

नांदेड शहरातील जिल्हा परिषद कार्यालय बाजूस सन्मान प्रेस्टीज येथे झालेल्या निधी संकलन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी श्रीराम मंदिर निर्माण कार्य चालू झाल्यामुळे आनंद व्यक्त केला.

नांदेड : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्राचे जन्मस्थानी भव्य राम मंदिर उभारणीसाठी तसेच त्यासाठी निधी संकलन आणि संपर्कासाठी नांदेड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंघजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी श्री १०८ ष. ब्र. डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, प्रा. सु. ग. चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अनंत पांडे व संघचालक डॉ. सुधीर कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड शहरातील जिल्हा परिषद कार्यालय बाजूस सन्मान प्रेस्टीज येथे झालेल्या निधी संकलन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी श्रीराम मंदिर निर्माण कार्य चालू झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. व बाबाजींनी श्रीराम मंदिराच्या लढ्याचा व शीख पंथाचा  इतिहास सर्वांसमोर जिवंतपणे उभा करीत हे मंदिर निर्माण होणे अत्यंत आवश्यक होते असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने जिल्ह्यातून प्रथमतः मंदिरासाठी निधी अर्पण करुन सुरुवात केली. त्याचबरोबर श्री १०८ ष. ब्र. डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड यांनी मार्गदर्शन करून निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

हेही वाचाकैद्याकडील मोबाईल प्रकरण : तुरुंग अधीक्षक नियंत्रण कक्षात, नांदेड कारागृहाची धूरा सोनुने यांच्यावर -

अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष तथा अभियानाचे उपाध्यक्ष प्रा. सु. ग. चव्हाण यांनी अभियाना संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले तसेच या अभियानात सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन हे अभियान नांदेड जिल्ह्यात सफल करावे असे आवाहन केले. त्यांनतर विहिंप प्रांतमंत्री अनंत पांडे यांनी राम मंदिरासदर्भात विषय मांडणी करुन श्रीराम मंदिर निर्माणासाठी ४९२ वर्ष संघर्ष झाला. आज पर्यंत ज्या स्थितीत राम मंदिर होते ते पारतंत्र्याचे प्रतीक होते आता जे भव्य मंदिर निर्माण होणार आहे हे सर्व भारतीयांच्या सहयोगातून स्वातंत्र्याचे प्रतीक राहणार आहे असे सांगितले.

यावेळी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर कोकरे यांनी श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान समिती स्थापन केली. या समितीमध्ये अध्यक्ष श्री १०८ ष. ब्र. डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड तर उपाध्यक्ष प्रा. सु. ग. चव्हाण व सदस्यांची खालीलप्रमाणे नावे जाहीर केली यामध्ये श्री मुकुंदबुवा नांदेडकर (महानुभव पंथ नांदेड) , श्री गुरु नराशाम महाराज (येवती संस्थान मुखेड), ह. भ. प. श्री एकनाथ महाराज कंधारकर, श्री आनंद महाराज कोलंबीकर, श्री धर्मभूषण वटेमोड महाराज उत्तराधिकारी हाळदेकर महाराज, ह. भ. प. श्री एकनाथ महाराज उंब्रजकर ह. भ. प. श्री माधव महाराज केंद्रे, ह.भ.प श्री चंद्रकांत महाराज लाटकर, ह. भ. प. डॉ. श्री. बी. सी. साजने, वे. शा. स. श्री विश्वासशास्त्री घोडजकर, सुभाष कन्नावार, रवि डोईफोडे, संजय औरादकर, सुमित मोरगे, विक्रांत खेडकर, विहिंप जिल्हाध्यक्ष नविनभाई ठक्कर यांची नावे आहेत.

त्याचबरोबर कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून भाजप प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, आमदार राजेश पवार, शहरसंघचालक गोपाळ राठी आदींसह सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना राजीव सोनटक्के, सूत्रसंचालन बालाजी संगेवार तर आभार अभियान जिल्हाप्रमुख शशिकांत पाटील यांनी मानले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Shriram Temple Construction Fund Dedication Liaison Office Sant Baba Balwinder Singh nanded news