नांदेड जिल्ह्यात बाधीत क्षेत्रात वाढ; ३८५ कोटींची मदतीची मागणी

अभय कुळकजाईकर
Sunday, 25 October 2020

नांदेड जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा नांदेड जिल्ह्याला तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी झाली.

नांदेड - नांदेड जिल्ह्यामध्ये ता. एक जून ते ता. २२ ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे सोळा तालुक्यातील सात लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील खरिप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणाऱ्या ३८४ कोटी ८० लाख रुपयांची मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा सात लाख ७७ हजार ६२८ हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी जून महिन्यापासूनच पावसाला सुरूवात झाली होती. समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पिकांची परिस्थिती देखील चांगली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नदी, ओढे, नाल्यांना पूर आले. त्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

हेही वाचा - परभणी : कार व ट्रकच्या अपघातात तीन मुलांसह नऊजण जखमी, वाहतुक विस्कळीत
 

आक्टोंबरमध्येही पावसाने नुकसान
जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा नांदेड जिल्ह्याला तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी झाली. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्याचबरोबर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी देखील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्याचबरोबर विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.   

हेही वाचलेच पाहिजे - जंगल गस्तीत अवैध वृक्षतोडीचे 49 सागवान नग वन विभागाने केले जप्त 

जिल्हा प्रशासनाने केले सर्वेक्षण
याबाबत शासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यात नुकसानीचे सर्वे केले. यात पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील जिरायती, बागायती फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी पाठविला होता. यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण ३८४ कोटी ८० लाख १२ हजार १८८ रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. दरम्यान, राज्य शासनाने जिरायती व बागायती पिकासाठी प्रती हेक्टर दहा हजार तर फळपिकांसाठी पंचवीस हजार रुपये भरपाई जाहीर केल्यामुळे जिल्ह्याला लागणाऱ्या मदत निधीत वाढ होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in affected area in Nanded district; 385 crore assistance sought, Nanded news