‘यांचा’ अखेरचा प्रवासही वेदनादायकच...कोणाचा ते वाचा?

file photo
file photo

नांदेड : समाजाचा एक घटक असतानाही त्यांना समाजात नकारघंटा मिळते. समाजाने नाकारले असतांनाही आपलेही आयुष्य आहे ते आपणास सन्मानाने जगता आले पाहिजे असा विश्‍वास बाळगून जिल्ह्यातील जवळपास दोन हजार तृतीयपंथीय वाटचाल करतात. त्यांना राहण्यासाठी कोणी घरसुद्धा किरायाने देत नाहीत. त्यांच्यापासून दोन हात दूर राहिलेले बरे असा समज समाजातील लोकांचा झाला आहे. आयुष्यभर त्रास सहन करुन जगणाऱ्या या घटकांना मरणानंतरही अंत्यविधीसाठी जागा नसल्याने त्यांचा अखेरचा प्रवासही वेदनादायकच असल्याचे पहावयास मिळते. 

जिवंतपणी समाजाने दुर्लक्षित केलेल्या तृतीयपंथीयांना मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याने त्यांच्या प्रयत्नांची हेळसांड होत आहे. शहरात स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी या मागणीसाठी मागील पाच वर्षापासून तृतीयपंथीयांचा लढा सुरू असला तरी महापालिका प्रशासनाने हा विषय थंडबस्त्यात ठेवला आहे. या घटकाला स्मशानभूमी मिळावी यासाठी न्यायालयानेसुद्धा पाठपुरावा केला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा आश्‍चर्य: जप्त वाळूला पाय फुटले...कुठे ते वाचा?
 
अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नाही

शहराच्या विमानतळ परिसरातील सांगवी, हिंगोली गेट, लालवाडी, मेहबूबनगर, श्रावस्तीनगर, दत्तनगर आदी भागात तृतीयपंथी किरायाने अगदी अडगळीच्या जागी वास्तव्यास राहतात. एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस एखाद्या रस्त्याच्या बाजूला खड्डा करून त्यात प्रेताचे दफन करण्यात येते. एखाद्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गेले तर त्यासाठी त्यांचा दफनविधी करू दिला जात नाही. अशावेळी प्रेत घेऊन इतरत्र भटकावे लागते. या ठिकाणी कोणी येणार नाही अशी एखादी जागा हेरून त्या ठिकाणी प्रेताला दफन केल्या जाते. हे करताना कोणी येईल का अशी भीती सतावत असल्याच्या भावना तृतीयपंथियांचे प्रमुख गौरी देवकर हिने सांगितले. 

कमल फाऊंडेशनसुध्दा त्यांच्या स्मशानभूमीसाठी प्रयत्नरत

येथील कमल फाऊंडेशनसुध्दा त्यांना स्मशानभूमी व बीएसयुपीचे घरकुल मिळावे यासाठी सतत प्रयत्न करतात. या तृतीय पंथीयांच्या अधिकार व हक्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण नेहमीच कायदेविषयक शिबीर घेऊन त्यांच्या मदततीसाठी पुढे येते. तृतीयपंथीय समाज म्हणून भारत सरकारने मान्यता दिली असली तरी मानवतेच्या दृष्टीने तृतीयपंथीयांना त्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देऊन महापालिकेने न्याय दिला पाहिजे. जागेचा प्रश्न समोर येतो यासंदर्भात महापालिकेला निवेदन देण्यात आले त्यानंतर आश्वासन दिले मात्र आमची कोणीही दखल घेतली नाही असे कमल फाऊंडेशनचे अमर गोधणे यांनी सांगितले. 

रडत ओरडत त्याच्या प्रेतयात्रा काढली जाते

एखाद्या तृतीयपंथीयांचा मृत्यू झाल्यास तो पुढच्या जन्मी तृतीयपंथी म्हणून जन्माला येऊ नको म्हणून प्रेताला शिव्या दिल्या जातात. रडत ओरडत त्याच्या प्रेतयात्रा काढली जाते. जीवनाचे सर्व रस्ते अर्धवट राहिल्यानंतर अखेरचा प्रवास तरी सुरळीत व्हावा अशी इच्छा घेऊन तृतीयपंथीय मागील पाच वर्षांपासून स्वतंत्र स्मशानभूमीसाठी लढा देत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com