लोहा : गांधीनगर येथील रस्त्यासाठी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप 

बा.पु. गायखर 
Monday, 28 September 2020

तालुक्यातील धानोरा मक्ता हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून या गावांतर्गत  तीन किलो मीटर अंतरावर गांधिनगर ही वस्ती 35 वर्षापासूनची आहे मात्र गांधीनगर ला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच संपर्क तुटतो

लोहा ( जि. नांदेड ) : लोहा तालुक्यातील गांधी नगर (धनोरा मक्ता ) येथील महिलांनी एकत्र येऊन पुरामुळे गावचा संपर्क तुटतो आहे. या गावाला मुख्य रस्ताच नसल्यामुळे आंदोलन करत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले आहे. महिलांचे  35 वर्षापासून आंदोलन सुरू असून आतापर्यंत 82 निवेदन शासनाला दिले असल्याचे सांगण्यात आले. .

तालुक्यातील धानोरा मक्ता हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून या गावांतर्गत तीन किलो मीटर अंतरावर गांधिनगर ही वस्ती 35 वर्षापासूनची आहे. मात्र गांधीनगरला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच संपर्क तुटतो. या नदीला  मोठा पूर आला की नागरिकांचा संपर्क तुटतो. नुकतेच गांधीनगर येथील शेतकरी गजानन बालाजी नागरगोजे हे लोहा येथील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना अचानक ढगफुटी झाली आणि धानोरा येथील नदीच्या पुरात अडकले. त्यांनी एका पुरातील झाडाचा आश्रय घेतला होता. तब्बल दोन तासांनंतर त्यांना बाहेर काढले.

हेही वाचा -  दुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू -

महापुराने रस्त्यातील दोन नाले त्यावरील पूल वाहून गेले

गांधीनगर येथील नागरिकांनी गेल्या दोन वर्षापूर्वी नदीपात्रात बेमुदत उपोषण केले होते. तत्कालीन आमदार शंकर धोंडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांन रस्ता बांधणीच्या सूचना दिल्या होत्या. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्यासाठी पन्नास हजार रुपयाचा निधी उपलब्ध केला होता. यापूर्वी गांधीनगर येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून दोन लाख रुपये ऊभारून पांदन रस्त्याला मजबुतीकरण केले होते. दरम्यानच्या काळात महापुराने रस्त्यातील दोन नाले त्यावरील पूल वाहून गेले.

महिला दक्षता समितीचा पुढाकार

आज घडीला गांधीनगर ते धानोरा मक्ता संपर्क तुटलेला आहे. कुठलेही वाहन ये - जा करत नाही. आंदोलनाचा भाग म्हणून गांधीनगर येथील महिला दक्षता समितीने धानोरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला सोमवारी ( ता. 28 ) सकाळी कुलूप लावले. लोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

येथे क्लिक करानांदेडच्या कापूस संशोधन केंद्रात आजपासून मिळणार रब्बी बियाणे

या आहेत मागण्या

निवेदनात गांधीनगरसाठी तीन मजबूत उड्डाणपुलाची आवश्यकता असून डांबरी रस्ता करून देण्यात यावा. अंतर्गत रस्ते करावीत. धानोरा मक्ता अंतर्गत असलेले दोन तांडे सुभाषनगर गांधीनगर या वस्तीला अवैद्य दारूचा पुरवठा करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा. विजेचा तुटवडा असल्याने दोन विद्युत जनित्र बसवण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. महिला दक्षता समिती सुक्षला केंद्रे, चौवुञा दहिफळे, प्रेमाला येमे, लक्ष्मीबाई अकोले, लक्ष्मीबाई कोरे, यांच्यासह संभाजी नागरगोजे, सुरेश नागरगोजे ,भीमराव अकोले, दत्तात्रय माटोरे , बालाजी पिंपळपल्ले, उत्तम नागरगोजे, संभाजी आकले यांचा सहभाग होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loha: The Gram Panchayat has been locked up for demanding a road in Gandhinagar nanded news