महाविहार बावरीनगरात यंदा “ऑनलाइन”धम्म परिषद, देशविदेशातील भिक्खु संघाची धम्मदेसना

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 19 January 2021

नांदेडपासून उत्तरेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभड येथील महाविहार बावरीनगरात सन १९८८ पासून दरवर्षी ‘दोन दिवशीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे' आयोजन करण्यात येते

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : दक्षिण भारतात सर्वात मोठी असलेली अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद यंदा आॅनलाईन होणार आहे. या आॅनलाईन धम्म परिषदेत देशविदेशातील भिक्खु संघ धम्मदेसना देणार आहेत.

नांदेडपासून उत्तरेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभड येथील महाविहार बावरीनगरात सन १९८८ पासून दरवर्षी ‘दोन दिवशीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे' आयोजन करण्यात येते. देश विदेशातून पाचारण करण्यात येणार्‍या विद्वान भिक्खूंकडून धम्मदेसना ग्रहण करण्यासाठी लाखोंच्या संख्येत श्रद्धावान उपासक–उपसिका येथे येत असतात. कोव्हिड-१९ विषाणूच्या सर्वदूर झालेल्या प्रादुर्भावामुळे तथा शासनाच्या निर्देशांमुळे, यावर्षी आयोजित होणारी ‘३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद’दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणालीद्वारे आयोजित करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.  

महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभरात नावलौकिक असलेले तथा शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेले हे ठिकाण बुद्धकालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ “बावरीनगर”म्हणून संबोधिल्या जाते. प्रतिवर्षीप्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी पौष पौर्णिमेला (ता. २८ व २९) दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा’चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे.

हेही वाचानायगाव तालुक्यात मतदारांनी आमदार रातोळीकरांना तारले तर आमदार पवारांना ठोकरले

या दोन दिवासीय दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली द्वारे आयोजित धम्म परिषदेत इटली, फ्रांस, आयर्लंड, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदी देशांतील पूजनीय भिक्खू वेन. विमलरत्न थेरो, वेन. विजिथा थेरो, वेन. प्रा. औंग मारमा तथा भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु विणय बोधिप्रिय थेरो, भिक्खु पय्यारत्न थेरो, भिक्खु हर्षबोधी थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु ज्ञानरक्षित- औरंगाबाद, भिक्खु संघपाल इत्यादी देश विदेशातील विद्वान भिक्खुंची धम्मदेसना होईल. 

यावर्षी आयोजित होणा-या ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत कोणत्याही प्रकारची दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अगर त्याचा प्रसार होऊ नये व अशा संकटसमयी स्वत: च्या आरोग्याची काळजी घेणेदेखील आवश्यक असल्याने सर्व उपासक उपसिकांनी महाविहार बावरीनगर येथे धम्म परिषदेकरीता प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपल्या निवासस्थानाहुनच सोशल मिडियावर दूरदृश्य ( ऑनलाईन ) प्रणालीद्वारे धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavihar Bavarinagar organizes "Online" Dhamma Council this year, Dhammadesana of Bhikkhu Sangh from home and abroad nanded news