नांदेड : माणूस जन्माने नव्हे तर जगण्याने बौद्ध असतो- डॉ. दीपक कदम

file photo
file photo

नांदेड : माणूस जन्मत: च नैसर्गिक असतो. म्हणजेच तो आधी विज्ञानवादीच असतो त्यानंतर तो धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होतो. परंतु बौद्ध समाजात जन्माला आलेला माणूस जन्माने नव्हे तर जगण्याने बौद्ध असतो असे प्रतिपादन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख डॉ. दीपक कदम यांनी नांदेड तालुक्यातील खुरगाव येथे भारतीय मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात केले.

यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भंते पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्कुसंघ, श्रामणेर प्रशिक्षणार्थी, ज्येष्ठ कवी दु. मो. लोणे, साहित्यिक तथा धम्मसंदेश व धम्मदान यात्रा संकल्पक गंगाधर ढवळे, माजी उपप्राचार्य डॉ. साहेबराव इंगोले, अॅड. तेलगोटे, कुमार कुर्तडीकर, निवृत्ती लोणे, राज गोडबोले, डॉ. भावे, प्रा. विनायक लोणे, शंकर नरवाडे, आरती वांगीकर, पंचशीला महिला मंडळ यांची उपस्थिती होती.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे ता. २५ डिसेंबर हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. कदम बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मुलगा मुलगी हा कोणताही भेद न करता आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे. आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून जवळपास १८० पेक्षाही अधिक विद्यार्थी उच्च पदस्थ झाले आहेत. धम्म ही नवनिर्माणाची कार्यशाळा आहे, असेही ते म्हणाले. मिशनच्या माध्यमातून बहुजन समाजातील विविध जाती जमातींतील मुले मुलीही श्रामणेर दीक्षा घेऊन बौद्ध पद्धतीने जगण्याचा अनुभव घेतात. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हेच काम करीत आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती जन्माने नव्हे तर जीवनप्रणाली अंगिकारल्याने बौद्ध असतो. याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

सकाळच्या सत्रात धम्मसेवक महास्थविर यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. तत्पुर्वी भिक्खुसंघांनी महास्थविर यांचे स्वागत केले. तसेच डॉ. दीपक कदम व  मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. गंगाधर ढवळे, रणजीत गोणारकर यांनी डॉ. कदम यांचा सत्कार केला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, भंते मेत्तानंद, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकीर्ती, भंते श्रद्धानंद भंते सुदर्शन भंते सुमेध, भंते महानाम, भंते अश्वजीत, भंते शीलभद्र, रोहिदास भगत, उमाजी नरवाडे, वामन नरवाडे, आप्पाराव नरवाडे यांची उपस्थिती होती. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन भीमसंदेश पथकातील सहभागी उपसकांनी याचना केल्यानंतर भंते गणांनी उपासकांना त्रीसरण पंचशील दिले. भिक्खु संघाकडून धम्मदेसना कार्यक्रम संपन्न झाला. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?' या विषयावर ज्येष्ठ व्याख्याते दु. मो. लोणे यांनी व्याख्यान दिले. अॅड. तेलगोटे, राज गोडबोले, कुमार कुर्तडीकर आदींची समयोचित भाषणे झाली. त्यानंतर उपासकांनी धम्मदान दिले. कुर्तडीकर आणि सहकाऱ्यांनी प्रशिक्षण केंद्रास साऊंड सिस्टीम भेट दिली. तिसऱ्या सत्रात उपासिका आरती वांगीकर परिवाराकडून उपस्थितांना भोजनदान देण्यात आले. चौथ्या सत्रात सुगाव येथील शाहीर प्रकाश लोकडे यांच्या भीमगीत गायन पार्टी संचाचा बुद्धभीमगीते गीतसंगित गायनवादनाचा  कार्यक्रम संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत गोणारकर यांनी केले तर आभार नागोराव नरवाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक व उपासिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com