नांदेड जिल्ह्यातील सर्व आरओ विक्रेत्यांना केंद्र सरकारच्या जलसंसाधन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य

प्रल्हाद कांबळे
Monday, 14 December 2020

तथापि यात भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन, केंद्रीय भूजल प्राधिकरण यांनी दि. 26 ऑक्टोंबर 2020 रोजी जाहीर सूचनेद्वारे नमूद केल्याप्रमाणे ज्यांचे युनिट मायक्रो आणि स्मॉल इंटरप्राईजेस (एमएसईएस) मध्ये 10 हजार लिटरपेक्षा कमी पाणी जमिनीतून उपसा करतात त्यांना नाहरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे प्रतिपादित केले होते

नांदेड  : जिल्ह्यातील आरओ प्लांट चालकांनी आता भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय जलसंधारण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र संबंधीत आरओ प्लाटंवर आढळून आले नाही तर संबंधीत आरओ प्लांटवर कारवाई करुन प्लांट बंद करण्यात येईल अशा सुचना जिल्हाधिकारी डाॅ. विपीन आणि महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी दिल्या आहेत.

विजयसिंह दुब्बल आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व इतर या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार केंद्रीय भूजल प्राधिकरण यांची परवानगी / प्रमाणपत्र / नाहरकत प्रमाणपत्र जर घेतले नसेल तर शुद्ध (आरओ वाटर) कॅन विक्री करणाऱ्या पाणी विक्री युनिटधारकाविरुद्ध कारवाई करुन युनिट सिल करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा - मित्राचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, अंबाजोगाईचे चार युवक जागीच ठार

तथापि यात भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन, केंद्रीय भूजल प्राधिकरण यांनी ता. 26 ऑक्टोंबर 2020 रोजी जाहीर सूचनेद्वारे नमूद केल्याप्रमाणे ज्यांचे युनिट मायक्रो आणि स्मॉल इंटरप्राईजेस (एमएसईएस) मध्ये 10 हजार लिटरपेक्षा कमी पाणी जमिनीतून उपसा करतात त्यांना नाहरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे प्रतिपादित केले होते. अशा युनिटने केंद्रीय भूजल प्राधिकरण नागपूर यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सदर निर्देश लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सर्व पाण्याचे जार / कॅन विक्री युनिटधारकांनी निर्देशीत केल्याप्रमाणे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व अनुषंगिक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा त्यांच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेले प्रमाणपत्र सर्व संबंधित प्राधिकरणास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandatory Certificate of Naharkat of Water Resources Department of Central Government is mandatory for all RO Vendors in Nanded District