हॉटेल, रेस्टॉरन्ट, बारमधील कामगारांच्या कोरोना तपासणीसाठी फिरते पथक - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

अभय कुळकजाईकर
Thursday, 8 October 2020

नांदेड शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बारमधील कामगारांची फिरत्या पथकामार्फत तपासणी करण्यासाठी फिरते पथक स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ता. २३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत. 

नांदेड - शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बारमधील कामगारांची फिरत्या पथकामार्फत तपासणी करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. सात) दिले आहेत. एखादा कामगार कोरोनाबाधित असेल तर त्याच्यापासून  ग्राहकांना कोरोना विषाणुची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्देश सर्व संबंधित विभागप्रमुखांना त्यांनी दिले आहेत. 

राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने केलेल्या मार्गदर्शक प्रणालीचे तंतोतंत पालन करुन ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतू त्या ठिकाणी प्रवेश देताना ग्राहकाचे तापमान व थर्मल स्क्रिनिंग करुनच लक्षणे नसलेल्या ग्राहकांना प्रवेश द्यावा, हे बंधनकारक करण्यात आले आहे. कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाकारुन अशा बाधितांची तपशिलासह स्वतंत्र नोंदणी करुन असे तपशील आरोग्य विभाग व प्रशासनास उपलब्ध करुन देण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - वय कोवळे पण गुन्हेगारी करणे भोवले 

जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ता. नऊ ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते ता. २३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

असा आहे आदेश
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वये जिल्ह्यात शनिवारी (ता. नऊ ऑक्टोंबर) सहा वाजल्यापासून ते ता. २३ ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नियमाला मिळाली शिथिलता ‘अन्’ कार्यालये ‘लॉक’ 

यांना राहणार नाही लागू
शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Corona inspection team of hotel, restaurant, bar workers - Collector Dr. Vipin, Nanded news