esakal | महावितरणला : वादळीवारा व पावसाचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

उच्चदाबाचे २५६ पोल तर, लघुदाबाचे ५३२ पोल नादुरूस्त.

महावितरणला : वादळीवारा व पावसाचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गुरूवारी (ता. सात) मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या मोठ्या पावसाने महावितरणच्या भोकर विभागातील उमरी व भोकर तसेच देगलूर विभागातील देगलूर, धर्माबाद, बिलोली, नायगाव तर नांदेड ग्रामीण विभागांतर्गत येणाऱ्या मुदखेड परिसरातील वीजयंत्रणेला प्रचंड प्रमाणावर फटका दिला.

परिणामी वीजयंत्रणा विस्कळीत होवून ११४० वीजग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागला. मात्र कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत कष्ट घेत सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा चोवीस तासाच्या आत पुर्ववत करण्यात यश मिळवले.

सर्वाधिक फटका भोकर विभागाला 

जोरदार वारे आणि पावसामुळे सर्वाधिक फटका भोकर विभागाला बसला. उच्चदाब यंत्रणेचे १८ पोल तर लघुदाब यंत्रणेचे ६५ पोल जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर उच्चदाब यंत्रणेचे ६५ पोल तर लघुदाब यंत्रणेचे २१७ पोल वादळीवाऱ्याने तूटून पडले. तर उच्चदाब यंत्रणेचे ११७ पोल व लघुदाब यंत्रणेचे ७८ पोल वाकल्यामुळे १३ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. वारा व पावसामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरूस्तीचे काम हाती घेतले.

हेही वाचा -  Video : बारदाना गोडाऊनला आग ; लाखोंचे नुकसान

खंडीत झालेल्या सर्व गावांचा वीजपुरवठा पुर्ववत

नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी तात्काळ दुरूस्तीचे काम करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीना कामाला लावत तत्काळ वीजपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टिने सुचना केल्या. भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड यांनी उमरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. डी. लोणे व त्यांचे सहकारी तसेच माहूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पंकज देशमूख व त्यांच्या सहकार्यानी काल दिवसभर पडलेली विजेचे पोल उभे करून माहूर व उमरी परिसरातील गोळेगाव, निमटेक, चिंचाळा, नागठाणा, बोरजुनी, बिजेगाव, वाघलवाडा, हस्सा, हातनी, कौडगाव, कावलगुडा, महाटी व शिंगणापूर या गावांसह वीजपुरवठा खंडीत झालेल्या सर्व गावांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.

वारा व पावसाने थैमान घातल्यामुळे वीजयंत्रणेची मोठी हाणी

देगलूर विभागातही मोठ्या प्रमाणावर वारा व पावसाने थैमान घातल्यामुळे वीजयंत्रणेची मोठी हाणी झाली यामध्ये उच्चदाब यंत्रणेचे १४ पोल तर लघुदाब यंत्रणेचे ५३ पोल जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर उच्चदाब यंत्रणेचे १३ पोल तर लघुदाब यंत्रणेचे ४५ पोल वादळीवाऱ्याने तूटून पडले. तर उच्चदाब यंत्रणेचे १९ पोल व लघुदाब यंत्रणेचे ५४ पोल वाकल्यामुळे १३ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. देगलूर गामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे यांनी खंडीत झालेला वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी सहायक अभियंता अतूल अत्राम तसेच श्री इबीतवार यांच्यासह परिश्रम घेत अटकळी, खाटगाव, केसराळी, आदमपूर व आळंदी या गावासह सर्व गावांचा वीजपूरवठा चोवीसतासाच्या आत पुर्ववत केला. 

येथे क्लिक करा - ‘ही’ बँक ग्रामीण महिलांची जीवनवाहिनी

मुदखेड परिसरातही वीजयंत्रणा विसकळीत झाली होती

मुदखेड परिसरातही वीजयंत्रणा विसकळीत झाली होती. दोन उच्चदाबाचे तर दहा लघुदाब यंत्रणेचे पोल कोसळले तर १५ पोल तुटून पडले होते. नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम दासकर, देगलूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चाटलावार तसेच भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड यांनी वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी परिश्रम घेतले