नांदेडला मंगळवारी ३३२ पॉझिटिव्ह; बरे होण्याचे प्रमाण वाढले

अभय कुळकजाईकर
Tuesday, 8 September 2020

नांदेडला दिवसभरात मंगळवारी (ता. आठ) दिवसभरात ३३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर दिवसभरात २८३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण ६६.१५ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, उपचार सुरु असताना चार रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. 

नांदेड - गेल्या आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या दररोज तीनशेच्या वर जात असून मंगळवारी (ता. आठ) प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा ३३२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अतिगंभीर रुग्णांची संख्या ३६ असून चार जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या एकूण एक हजार ५२३ अहवालापैकी एक हजार १३७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण रुग्ण संख्या नऊ हजार ५७८ झाली आहे. त्यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे ८९ तर ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे २४३ रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांची बैठक बोलविणार, परभणीचे खासदार देणार लढा -

आत्तापर्यंत २७६ जणांचा मृत्यू
दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सावरमाळ (ता. मुखेड) येथील महिला (वय ६२), पेठवडज (ता. कंधार) येथील पुरुष (वय ६२), नांदेडच्या गोकुळनगर येथील पुरुष (वय ७७) आणि गोपाळचावडी येथील महिला (वय २३) यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७६ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नांदेड शहर, नांदेड ग्रामिण, अर्धापूर, देगलूर, हिमायतनगर, किनवट, लोहा, उमरी, हदगाव, मुखेड, नायगाव, कंधार, बिलोली, धर्माबाद, मुदखेड, माहूर या तालुक्यासह परभणी, हिंगोली आणि यवतमाळ येथील रुग्णांचा समावेश आहे.  

६६.१५ टक्के रुग्ण बरे
शहर आणि जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात सध्या तीन हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ३६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या २८३ रुग्णांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सुटी झालेल्या रुग्णांची संख्या सहा हजार ११७ एवढी झाली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - अल्पभूधारक शेतकऱ्याचा कुटूंबीयासह आत्मदहणाचा इशारा -

नांदेड कोरोना मीटर 

  • एकूण घेतलेले स्वॅब - ५७ हजार ९८५
  • एकूण निगेटिव्ह स्वॅब - ४६ हजार ४९
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - नऊ हजार ५७८
  • आज मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३३२
  • एकूण मृत्यू संख्या - २७६ 
  • आज मंगळवारी मृत्यू संख्या - चार
  • रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या - सहा हजार ११७
  • आज रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - तीन हजार १२९
  • सध्या अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ३६ 
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ५८८

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded 332 positive on Tuesday; Healing rate increased, Nanded news