नांदेडचा आणि माझा कायमचा ऋणानुबंध - ज्येष्ठ साहित्यिक मारूती चित्तमपल्ली

अभय कुळकजाईकर
Tuesday, 13 October 2020

विदर्भातील विशेषतः नागपूरमधील दीर्घ वास्तव्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली हे सोलापूरात आपले पुतणे श्रीकांत चितमपल्ली यांच्याकडे वास्तव्य करणार असून ते नागपूरहून सोलापूरकडे निघाले होते. यवतमाळहून ते रविवारी (ता. ११) नांदेडला आले. येथील शासकीय विश्रामगृहात होकर्णे परिवाराने त्यांचे आदरातिथ्य केले. येथील एक तासाच्या भेटीत चितमपल्ली यांनी नांदेडमधील अनेक आठवणींना उजाळा दिला.

नांदेड - नांदेडशी माझा कायम ऋणानुबंध राहिला असून सोलापूरात वास्तव्यात गेल्यानंतरही हा ऋणानुबंध कायम राहणार आहे. येथील आदरातिथ्यामुळे मी भारावलो असून बोलण्यासाठी शब्द फुटत नाहीत. हृदय भरून आले, अशा शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विदर्भातील विशेषतः नागपूरमधील दीर्घ वास्तव्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली हे सोलापूरात आपले पुतणे श्रीकांत चितमपल्ली यांच्याकडे वास्तव्य करणार असून ते नागपूरहून सोलापूरकडे निघाले होते. यवतमाळहून ते रविवारी (ता. ११) नांदेडला आले. येथील शासकीय विश्रामगृहात होकर्णे परिवाराने त्यांचे आदरातिथ्य केले. येथील एक तासाच्या भेटीत चितमपल्ली यांनी नांदेडमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ साहित्यिक (कै) नरहर कुरूंदकर व (कै.) राम शेवाळकर यांच्यामुळे मी लेखन करण्यास शिकलो. होळीवरील संस्कृत पाठशाळेत यज्ञेश्वर शास्त्री यांच्याकडे संस्कृत शिकलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

हेही वाचा - नांदेडला अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके गेली नासून 

नांदेडमध्ये सुरू झाली सेवा
नांदेडमध्ये त्यांनी आपल्या वनविभागाच्या सेवेची सुरूवात केली होती. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील आदिवासी बांधवाबरोबर केलेल्या वास्त्यव्याच्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या. साडेचार दशक विदर्भात राहिलो असून तिथे समृध्द आयुष्य जगलो, आदिवासी भाषेचा अभ्यास या ठिकाणी केला असून त्यांनी ३० पुस्तके लिहली आहेत. आता सोलापूरला जात आहे, तिथे जंगल नाही; परंतु तिथे झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेणार आहे. प्रत्येकाने रक्तचंदनाची झाडे लावली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विविध कोशांचे काम पूर्ण करणार
सोलापूरातील वास्तव्यात आपण विविध कोशांचे काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण हा विषय केवळ वर्गात शिकवून चालणार नसून प्रत्यक्षात मुलांना जंगलात नेवून या विषयाचे ज्ञान दिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांचा होकर्णे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत चितमपल्ली, संगीता बोयने, सुभाष बोयने, विजय होकर्णे, अरूणा होकर्णे, महेश होकर्णे, लक्ष्मण संगेवार, एल. के. कुलकर्णी, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, राजेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

हेही वाचलेच पाहिजे - गंगाखेडच्या दसरा महोत्सवाची सातशे वर्षाची परंपरा होणार खंडित 

नाचणीच्या खिरीचा घेतला स्वाद
ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांची आवड लक्षात घेऊन अरूणा होकर्णे यांनी खास करून नाचणीची स्वादिष्ट खीर आणली होती. या खिरीचा स्वाद त्यांनी घेतला. तसेच लगेचच खिर उत्तम झाली असा अभिप्रायही दिला. त्यामुळे समाधानाचे हास्य होकर्णे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर फुलले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded and my permanent bond - senior literary Maruti Chittampalli, Nanded news