नांदेड - ​ महावितरण कर्मचाऱ्यांची मनमाणी; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष 

शिवचरण वावळे
Monday, 11 January 2021

लॉकडाउननंतर आजही अनेक ठिकाणी महावितरण विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मिटर रिडिंग घेत नाहीत. त्याऐवजी ग्राहकांनीच स्वःताच्या मीटरची रिडिंग आॅनलाइन पद्धतीने मोबाईल अॅपद्वारे नोंद करणे आवश्‍यक असल्याचा मोबाईलवर मेसेज देखील येत आहे. मात्र अनेक ग्राहकांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्या मिटरची रिडिंगची नोंदच होत नाही

नांदेड - लॉकडाउन दरम्यान अनेकांच्या हातचा रोजगार हिरवाला, नौकऱ्यांवर गदा आली. अशात दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न सतावणाऱ्या ग्राहकांना लाईटबिल भरायचे कसे, असा मोठा प्रश्‍न शेकडो नागरीकांसमोर होता. दरम्यान महावितरण विभागाने देखील वीजबिल सक्तीने वसूल न करता वीजबील भरण्यासाठी सवलत देत त्यांच्या कलानुसार वीजबिल भरण्याचे अवाहन केले खरे, दरम्यान अनेकांच्या मिटरचे रिडिंग न घेताच अंदाजे बिल देण्याचा प्रकार सुरु असल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

विज ग्राहकांना आॅनलाइन वीजबिल भरण्याची मुभा दिली जाते. याशिवाय लॉकडाउननंतर आजही अनेक ठिकाणी महावितरण विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मिटर रिडिंग घेत नाहीत. त्याऐवजी ग्राहकांनीच स्वःताच्या मीटरची रिडिंग आॅनलाइन पद्धतीने मोबाईल अॅपद्वारे नोंद करणे आवश्‍यक असल्याचा मोबाईलवर मेसेज देखील येत आहे. मात्र अनेक ग्राहकांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्या मिटरची रिडिंगची नोंदच होत नाही. तरी देखील अशा ग्राहकांना अंदाजे अव्वाच्या सव्वा वीज बिल दिले जात आहे. 

हेही वाचा- एसटीच्या तिकीट मशीन झाल्या ‘हॅंग’, स्मार्ट कार्ड लागेना ​

लाईटबिल कमी करण्यासाठी नागरीकांची धावाधाव

 त्यामुळे सरासरीच्या नावाखाली चक्क पाच पटीने विज बिल वाढवून येत आहे. पूर्वी आडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत येणारे लाईटबिल आता दोन ते तीन हजार रुपये इतके दिले जात आहे. लाईटबिल कमी करण्यासाठी गेलेल्या नागरीकांना महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना हा भाग आमच्याकडे येतच नाही. तुम्ही अमुक व्यक्तीला भेटा असे म्हणून फिरवा फिरवी करत आहेत. तर अधिकारी उडवा उडवी करुन वेळ मारुन नेण्याचे काम करत असल्याने ग्राहक मेटाकुटीला येत आहेत. 

हेही वाचा- पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध रॅली

बेलावर वेगळा, मीटरवर वेगळा नंबर

लॉकडाउन दरम्यान अनेक ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराकडून महावितरण कार्यलयास न सांगताच परस्पर मिटर बदलणे असे प्रकार देखील केल्याने प्रत्यक्ष वीजबिलावर एक ग्राहक व मिटर क्रमाक आणि बदलुन दिलेल्या मिटरवर एक क्रमांक आहे. 

तीन महिण्यापासून कार्यालयाच्या चकरा मारतोय 

सिडको मध्ये माझ्या मालकीचे एक छोटे घर आहे. या ठिकाणी घरकाम करणारी महिला किरायाणे राहते. लाईट शिवाय तिच्याकडे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मला महिण्याला अडीचशे ते साडेतीनशे रुपये या पुढे वीजबिल आलेले नाही. मात्र लॉकडाउन मध्ये १७ हजारापेक्षा अधिकचे विजबिल दिले गेले आहे. या बद्दल अनेकवेळा महावितरणाकडे तक्रार करुन देखील उपयोग झाला नाही. माझ्या परस्पर मिटर बदली करण्यात आले. त्याचा मिटर क्रमांक वेगळा आणि बिलावरील मिटर क्रमांक वेगळा आहे. 
- सखाराम आठवले, विज ग्राहक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - Arbitrariness of MSEDCL employees; The authorities also ignored Nanded News