Video : नांदेडला भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना ठरतेय आधार, वीर सैनिक ग्रुपचा पुढाकार

शिवचरण वावळे
Sunday, 20 September 2020

सैनिकपूर्व आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यासाठी वीर सैनिक ग्रुपने पुढाकार घेत गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलिस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु केल्याने विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे. 

नांदेड - लॉकडाउन दरम्यान स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता. विशेष करुन सैनिकपूर्व आणि पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यासाठी वीर सैनिक ग्रुपने पुढाकार घेत गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलिस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु केल्याने विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे. 

लॉकडाउनपूर्वी प्रवीण देवडे हा सैनिक सुटीवर गावी आला आणि अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. अनेकांना शासकीय मदत वेळेवर पोहचत नव्हती. म्हणून या ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण इटणकर यांची भेट घेऊन वीर सैनिक ग्रुपची मदतीसाठी तयारी दर्शविली. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी क्षणाचाही विचार न करता या ग्रुपच्या सदस्यांना पुढे येण्याचे आवाहन केले. सैनिक ग्रुपच्या सदस्यांनी सलग पंधरा दिवस गरजूंना जेवणाचे डब्बे, फळांचे वाटप, झोपडपट्टी व तृतीय पंथींयाना राशनकीट वाटप, परप्रांतीयांना जेवण देणे आदी सेवाकार्य केले.   

हेही वाचा- व्हिडीओ - कोरोना चाचणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन गंभीर नाही

बाहेर गावचे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित

काही दिवसांपूर्वीच या ग्रुपचे सदस्य प्रवीण देवडे पुन्हा सैन्यात परतले आणि त्यांचा सहकारी सैनिक व्यंकटेश ताटे पाटील हे सुटीवर घरी आले. त्यांनी वीर सैनिक ग्रुपचा हा उपक्रम अखंडित पणे सुरु ठेवला. जमेल त्या पैशातून त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. परंतु बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना शहरात राहण्याची सध्या सुविधा नसल्यामुळे केवळ शहरी भागातील मुलांनाच या प्रशिक्षणाचा लाभ मिळत आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास सामान्यातला सामान्य विद्यार्थी सैन्यात अथवा पोलीसात जाण्याचे स्वप्न निश्‍चितच पूर्ण होईल.   

हेही वाचले पाहिजे- लालपरी धावते, मात्र पोटासाठी सारेच थकले ​

पोलीस भरतीची घोषणा 

सैनिक ग्रुपच्या सदस्यांनी पैसे जमा करुन प्रशिक्षणाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. मागील पंधरा दिवसांपासून ३० ते ४० विद्यार्थ्यांना ग्रुपच्या वतीने मोफत प्रशिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांना रोज मोकळ्या मैदानात दहा किलोमीटर रनिंग, सोबतच शासकीय आणि बौद्धीक तयारी करुन घेतली जाते. नुकतेच राज्य सरकारच्या वतीने पोलीस भरतीची घोषणा केल्याने पोलीसात भरती होण्याच्या अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे वीर सैनिकच्या ग्रुपचे सर्व सैनिक सदस्य देखील या ग्रुपला आर्थिक मदत करुन पाठबळ देण्याचे काम करत आहेत.

नवीन शुज देण्याचा आमचा मानस
वीर सैनिक ग्रुप हा समाजकार्याच्या हेतूने स्थापन झालेला ग्रुप आहे. आमच्याकडे समाज कार्यासाठी सर्व काही आहे. परंतु आर्थिक बाजू कमी पडत आहे. आम्ही सैनिक मिळून दरमहा जे पैसे जमा करतो त्यातून हा उपक्रम सुरु केला आहे. अनेकांच्या पायात बुट नाहीत, अशांना नवीन शुज देण्याचा आमचा मानस आहे.  
- प्रवीण देवडे (सैनिक ग्रुप सदस्य)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - Free pre-recruitment training for students, Veer Sainik Group Nanded News