नांदेड : रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना "मायेची ऊब" हा ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम- लॉयन्स क्लब

प्रल्हाद कांबळे
Monday, 9 November 2020

वीस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंटद्वारे ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

नांदेड : यावर्षी कडाक्याची थंडी पडल्यामुळे रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना "मायेची ऊब "हा ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे सुरू करण्यात येणार असून यामध्ये कमीत कमी  वीस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंटद्वारे ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

आगामी वर्ष 2021 असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण 2021 ब्लॅंकेट वाटण्याचा संकल्प  लॉयन्स परिवाराने केला आहे. लुधियाना  येथील कारखान्यातून घाऊक स्वरूपात ब्लॅंकेट मागण्यात येत असून एका ब्लॅंकेटचे वजन एक किलो आहे. एका ब्लॅंकेट ला रबर प्रिंटसह दोनशे रुपये शुल्क लागणार आहे.वीस ब्लॅंकेटसाठी चार हजार रुपये खर्च येणार आहे. रबर प्रिंट करण्याचा उद्देश असा आहे की, काही निराधार  मिळालेल्या वस्तू दुकानदारांना परत विकतात. त्यामुळे मूळ उद्देश बाजूला रहातो.  

हेही वाचा - नांदेड : उमरखेडमधील ढाणकी येथे ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी- खासदार हेमंत पाटील -

दिलीप ठाकूर यांच्या या अभिनव संकल्पनेला अनेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कै.नरसिंह दासजी गुडगिला यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना त्यांच्या तेरवीचा खर्च टाळून गुडगिला परिवाराने एक्कावन ब्लॅंकेट देऊन चांगला पायंडा पाडला. स्व. गोविन्दप्रसाद रामप्रसाद मोदी यांच्या स्मरणार्थ श्रीमती कंचनदेवी मोदी तसेच मुकेशकुमार अग्रवाल यांनी एक्कावन ब्लॅंकेट दिले आहेत. तीस ब्लॅंकेट देणाऱ्यांमध्ये कै. श्याम सुंदर अग्रवाल यांच्या स्मरणार्थ संजय अग्रवाल, कै. केरबा माधव गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार यांचा समावेश आहे. क्लासिक मेन्स वेअर,कै. कौशल्‍यादेवी मदनलालजी काबरा यांच्या स्मरणार्थ अरुणकुमार काबरा ,स्व. दिगंबरराव हिबारे यांच्या स्मरणार्थ प्रमोद हिबारे यांच्या तर्फे प्रत्येकी पंचवीस ब्लॅंकेट देण्यात आले आहेत.दिलीप ठाकूर, डॉ. विजय भारतीया, योगेश जैस्वाल, कै. शोभा नानासाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. निनाद जोशी, स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद, उषा चंद्रकांत चक्रावार, शैला शंकरराव कुलकर्णी, सागर जोशी, शिवराज पाटील, कै. श्रीमती सुरेखा सखारामपंत गिरगावकर यांच्या स्मरणार्थ नागेश गिरगावकर यांच्यातर्फे प्रत्येकी  वीस ब्लॅंकेट देण्यासाठी नोंदणी केली आहे.

प्रत्येकी दहा ब्लॅंकेट देणाऱ्यामध्ये  प्रा. दीपक बच्चेवार, दिलीप जोशी, कुमार कुलकर्णी, किशोर नोमुलवार, साक्षी कुनसावळीकर, ॲड. व्ही. आर. महाजन यांचा समावेश आहे. समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्या दानशूर नागरिकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार  असून पंचवीस हजार नागरिकापर्यंत दात्यांची माहिती पोंहचणार आहे. कमीत कमी दहा ब्लॅंकेट नागरिकांनी देऊन सहकार्य करावे असे आवाहन झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया,सचिव  लॉ. ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Lions Club distributes blankets to the destitute sleeping on the streets nanded news