नांदेड : सोयरिकेला आले अन नवरी घेऊन गेले, जाधव व लोमटे परिवाराचा पुढाकार...!

लक्ष्मीकांत मुळे
Saturday, 19 December 2020

तालुक्यातील पार्डी म. येथील जाधव व लोमटे परिवाराने सोयरिक करण्यासाठी आले असता लागलीच लग्न आटोपून नवरीला घेऊन  गेले आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

अर्धापूर  (जिल्हा नांदेड)- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ व  विविध कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात पडत होते. पण विवाह समारंभाला नातेवाईकांची अट घालून परवानगी मिळाली आहे. त्यातच तालुक्यातील पार्डी म. येथील जाधव व लोमटे परिवाराने सोयरिक करण्यासाठी आले असता लागलीच लग्न आटोपून नवरीला घेऊन  गेले आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

सोयरिकीच्या कार्यक्रमासाठी होती उपस्थिती

तालुक्यातील पार्डी म. येथील चांदोजी हारजी जाधव बळीरामपूरकर यांची मुलगी संजना उर्फ राणी हिचा विवाह डोंगरकडा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील मोतीराम पांडुरंगराव लोमटे यांचे चिरंजीव अनिल उर्फ जेठन यांच्या सोयरीकच्या कार्यक्रमासाठी पार्डी म. येथे पाहूणे वधू घरी आले होते. 

हेही वाचा नाट्यगृहाचे भाडे 75 टक्के कमी करा- महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरण व्यवस्थापक संघ -

यांनी घेतला पुढाकार....

सोयरीक जाहीर झाल्यानंतर लागलीच शाल- अंगठी (साखरपुडा) कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले शिवाजीराव उर्फ पप्पू अडकीणे, डॉ. सुधाकर लोमटे, बापूराव अडकीणे, नागोराव भांगे पाटील यांनी पुढाकार घेत हे कार्यक्रम आटोपल्यावर विवाह सोहळा उरकून घेऊयात म्ह्णून नातेवाईकांकडे प्रस्ताव  ठेवला. त्यासाठी नवरदेवाचे वडील मोतीराम लोमटे व नवरीचे वडील चांदोजी जाधव व संबंधित नातेवाईकांनी होकार दिला.  
 
एकाच दिवसात सर्वच कार्यक्रम

काही नातेवाईक व जवळची मंडळी यायची राहिली होती. त्यामुळे थोडा अवधी घेऊन शुक्रवारी रात्रीला विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न कार्यात होणारी हळद, कन्यादान, सूनमुख, साडे, पाळणाही हे विधीही याच कार्यक्रमात आटोपून सोपस्करही पूर्ण केला.  सोयरीक, साखरपुडा आणि लग्न एकाच दिवसात आटोपला.

विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतूक

अलीकडच्या काळातील कमी नातेवाईकात विवाह सोहळे होत असताना  एकाच दिवसात सर्व कार्यक्रम आटोपून वेळ, श्रम व पैसा या सर्वांची बचत केली. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जि. प.सदस्य दिलीपराव देसाई, भाऊराव कारखान्याचे संचालक रामराव कदम, दिगंबरराव भांगे, गोविंदराव मरकुंदे, संभाजीराव साबळे, ह.भ.प. बाबुराव भांगे, शंकर शिंदे, शिवाजीराव भांगेआदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: marrage came and took the bride, the initiative of Jadhav and Lomte family nanded news