नांदेड - अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रासाठी खासदार चिखलीकरांकडून २५ लाखाच्या निधी मंजूर

शिवचरण वावळे
Sunday, 30 August 2020

प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता गोड करुन मातंग समाजाला न्याय दिला आहे.

नांदेड- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता गोड करुन मातंग समाजाला न्याय दिला आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी मातंग समाजाच्यावतीने १५ डिसेंबर २०१९ रोजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दवराव भोसले यांच्याकडे करण्यात आली होती. या शिष्टमंडळात खासदार श्री. चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा-  नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य...

 शिस्टमंडळाच्या मागणीला यश 

कुलगुरु श्री. भोसले यांनी अण्णाभाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र विद्यापीठात स्थापन करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले होते. हे अध्यासन व अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचे कुलगुरुंनी मातंग समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज ३१ ऑगस्ट रोजी होत असतानाही विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होवू शकली नाही. मातंग समाजाच्यावतीने सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली खासदार चिखलीकर यांची ३० ऑगस्टला भेट घेत अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा- नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर ​

चिखलीकरांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद
 
खासदार चिखलीकर यांनी शिष्टमंडळाच्या भावना लक्षात घेवून तत्काळ माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी राज्य सरकारने दखल घेतली नसली तरी, खासदार या नात्याने विद्यापीठात हे अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करत असल्याची घोषणा केली. 

या वेळी मारोती वाडेकर, एम. बी. उमरे, बालाजीराव थोटवे, गंगाधरराव कावडे, गोपाळराव टेंभूर्णे, राजू मंडगीकर, गणपतराव गायकवाड, दशरथ कांबळे, रामदास कांबळे, यादव नामेवार, संभाजी गायकवाड, एन.जी.कांबळे यडूरकर, शंकरराव भंडारे, डो.ई. गुपिले, आर.जे.वाघमारे, मधुकर गोविंदराव वाघमारे, उत्तम बाबळे, पिराजी गाडेकर, रविंद भालेराव, शिवराज केदारे, प्रा. सुर्यवंशी एस. सी. माणिक कांबळे, निरंजन तपासकर यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: MP Chikhlikar approves Rs 25 lakh for Annabhau Sathe Study Center Nanded News