नांदेड : मुदखेड येथे माजी नगरसेवकासह भाजपच्या शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

गंगाधर डांगे
Sunday, 20 December 2020

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नगरसेवकांचीही पालिकेकडे तक्रार

मुदखेड ( जिल्हा नांदेड) : मुदखेड शहरात विविध भागात मुदखेड पालिकेच्यावतीने विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू असून सदरील कामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार नगरसेवक संजय आऊलवार यांच्यासह माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले व भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम ऊर्फ मुन्ना चांडक यांनी मुदखेड पालिकेकडे केली. सदरील कामाच्या ठेकेदारांनी तक्रारकर्त्यांनी खंडणीची मागणी केली असल्याची तक्रार मुदखेड पोलिस स्थानकात दिल्याने माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले व भाजपाचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम ऊर्फ मुन्ना चांडक यांच्यावर मुदखेड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुदखेड शहरात विविध विकास कामे पालिकेच्या वतीने ओमकार कंस्ट्रक्शनच्या माध्यमातुन चालु आहेत. याचेच एक काम न्याहळी येथे सी.सी. रोडचे काम चालु असताना ता. १८ डिंसेंबर रोजी  सकाळी साडेअकराच्या दरम्यान भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुदखेड पालिकेचे माजी नगरसेवक गोविंद गोपनपले व शहराध्यक्ष मुन्ना चांडक यांनी सदर काम बंद करुन पाच लाखांची खंडणी मागितली. म्हणुन ओमकार कंस्ट्र्क्शनचे ठेकेदार दादाराव शावजी ढगे यांच्या तक्रारीवरुन मुदखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदखेड शहरात नगर परिषदअंतर्गत तहसिल कार्यालयासमोर व्यापारी संकुल, लिंबोनीनगर येथे संस्कृती सभागृह, शहरातील रोडवर पेवर ब्लॉक, अशोकानगरमध्ये नाली बांधकाम, भिमनगरमध्ये सी. सी. रोड, न्याहळी येथे सी. सी. रोड यांसह दलित वस्तीत कोट्यवधीची विविध विकास कामे चालू आहेत. जवळपास सर्व कामे ओमकार कंस्ट्क्शन यांना ई-निवीदा टेंडर पद्धतीने देण्यात आले असून ओमकार कंस्ट्क्शनचे मुकदम मोहन देविदास पवार यांनी न्याहळी येथे चालू असलेले सी. सी. रोडचे काम पाहत होते. त्यावेळी माजी नगरसेवक गोविंद गोपनपले व भाजप शहराध्यक्ष मुन्ना चांडक यांनी चालू असलेले काम बंद केल्याची माहिती गुत्तेदार दादाराव ढगे यांना दिली.

हेही वाचा - साहेब आमच्यासगट बैल पण उपाशी हाईत -

मुकदम पवार याने माहिती देताच गुत्तेदार ढगे हे न्याहळी येथे आले सदर काम का बंद केले अशी विचारणा गोपनपले व चांडक यांना  केली त्यावेळी गोपनपले म्हणाले की तुम्ही चांगले काम करत नाही व आमचेकडे लक्ष देत नाही व मागील दिड वर्षांपासून तुमच्याविरुद्ध तक्रार करुन सुध्दा पैसे देत नाहीत असे नोंद पोलिस ठाण्यात गुत्तेदार दादाराव ढगे यांच्या तक्रारीवरुन करण्यात आली. गुतेदार दादाराव शावजी ढगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गोविंद गोपनपले व पुरुषोत्तम उर्फ मुन्ना चांडक यांच्या विरोधात मुदखेड पोलिस ठाण्यात कलम ३८५ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भाले हे तपास करीत आहेत.

आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले- माजी नगरसेवक गोपनपल्ले

या विषयी माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले व भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम ऊर्फ मुन्ना चांडक यांनी संयुक्त पत्रक काढुन या विषयी खुलासा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ता. १८ रोजी सकळी अकरा न्याहाळी येथे बोगस व निकृष्ट दर्जाचे काम केले जात होते. अंदाज पत्रकाप्रमाणे  काम होत नाही म्हणुन सुरुवात झाली असतांना गोविंद गोपनपल्ले, मुन्ना चांडक तसेच प्रभागाचा नगरसेवक संजय आऊलवार तसेच न. पा. चे दोन अभियंता व न्याहाळी येथील ग्रामस्त यांच्या समक्ष तोंडी व लेखी स्वरुपात गुत्तेदार यांना नोटीस देऊनसुद्धा गुत्तेदारांनी काम न थांबवता काम तसेच चालु ठेऊन मुदखेड न.पा. प्रशासनाचा आपमान केलेला असतांना, मी न. पा. कार्यालयात जाऊन चौकशी करण्यासाठी गेलो असता इंजिनीयर नितीन चव्हाण व मुख्याधिकारी रामराजे कापरे हे दोघेही मोबाईल बंद करुन पळून गेले
 
सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार यापूर्वी या प्रभागाचे नगरसेवक संजय पवार यांनी पालिकेकडे दिली होती. त्याचप्रमाणे आम्हीदेखील तक्रार दाखल केली होती. यावरुन पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास काम बंद ठेवण्याचे लेखी आदेश देऊन सुद्धा या ठेकेदाराने या भागात बोगस व निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा सपाटा चालूच ठेवला होता. म्हणून आमच्यासह या भागातील ग्रामस्थांनी मिळून ठेकेदाराचे काम बंद केले परंतु संबंधित ठेकेदाराने आकसबुद्धीने आमच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार खोटी दाखल केली. आमच्यावर गुन्हा दाखल केला सदरील कामाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे यावेळी गोपनपल्ले व चांडक यांनी प्रसिद्धीस काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A ransom case was filed against a BJP city president along with a former corporator at Mudkhed nanded news