Nanded: एसटीच्या संपाने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ST
एसटीच्या संपाने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

नांदेड : एसटीच्या संपाने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

नांदेड : गेल्या ता. २८ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप कर्मचारी संघटना आणि शासनामध्ये तोडगा निघाला नसल्याने अद्यापही सुरुच आहे. परिणामी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची चाके जागेवरच थांबलेली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड दोन वर्षाच्या काळात जागतिक महामारीमुळे जनजीवन ठप्प झाले होते. कालांतराने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रणालीने शैक्षणिक प्रवाहात ओढण्याचा प्रयत्न केला.

परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रणालीचा सकारात्मक उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली असताना शासनाने आॅफलाईन शिक्षणास परवानगी दिली व विद्यार्थी शाळेच्या दिशेने धावताना दिसू लागले. कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर जेमतेम महिनाभर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन धडे गिरवता आले व ध्यानीमनी नसताना अचानक राज्य परिवहन महामंडळाच्या संपाने आपल्या हक्काच्या मूलभूत मागण्यांसाठी संप पुकारून लालपरीची भ्रमंती थांबविली. त्यामुळे एसटीवर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण भागातील शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास थांबला.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्‍न ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे शिक्षणासाठी एसटीने प्रवास करतात. दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राची गांभीर्याने तयारी करावी लागत असल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या ही वेळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे नेहमी शाळेला दांडी मारणारे परंतु शैक्षणिक महत्त्व जपणारे विद्यार्थीसुद्धा अशावेळी नियमित शाळेत येताना दिसतात.

विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून प्रवास दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. ज्या ठिकाणी खासगी वाहन जातात तेथून जास्त पैसे मोजून विद्यार्थी शाळेत जाणे येणे करतात. परंतु, जिथे खासगी वाहन जात नाही तेथील विद्यार्थ्यांना बैलगाडीतून शाळेमध्ये जाणे येणे करावे लागत आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

शैक्षणिक प्रवासाला लागले ग्रहण अचानक शैक्षणिक प्रवासाला ग्रहण लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा पुन्हा एकदा काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांचा मोर्चा आॅनलाइन शिक्षणाकडे वळविला आहे. तेव्हा एक ना धड भाराभार चिंध्या, अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हा शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या संपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर करावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.

loading image
go to top