नांदेड : बळेगाव रस्त्यासाठी तळेगावकर उतरणार रस्त्यावर, काय आहे कारण?

file photo
file photo

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी तालुक्यातील वाळू वाहतुक करणाऱ्या अवजड ट्रकमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. जागोजागी रस्त्यावर खड्डे, तर काही भागात रस्त्याला पांदन रस्त्याची अवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन वाहनधारक व पायी चालणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागते. उमरी ते बळेगाव रस्त्याची चाळणी झाली आहे. या रस्त्यावरून धावणारी वाळू वाहतूक करणारी हायवा ही जडवाहने बंद करावी आणि रचाळणी झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा ता. आॅक्टोबर रोजी तळेगावरांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे. 

वाहनधारकांना कसरत करून आपले वाहन चालवावे लागत आहे. एवढेच नाही तर पायी जाणाऱ्यांही चांगलीच कसरत करावी लागत आहे. उमरी तालुक्यात आठ ते दहा वाळू घाट गोदावरी नदीवर असून सदर घाटावरुन काढलेली वाळू आधुनिक हायवा ट्रकद्वारे (६० ते ७० टन) वजनाची नेली जाते. दिवसाला २०० ते २५० हायवा ट्रक उमरी, बळेगाव, हंगीरगा, कारेगाव रस्त्यावरून वाहतूक करीत असतात. सदर ओव्हरलोड हायवा ट्रक मोठ्या प्रमाणात जाण्याने उमरी तालुक्यातील रस्ते खूप मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. 

या रस्त्यावर दोन फूट खोल खड्डे पडले 

रस्त्यावर फार मोठे खड्डे तयार होत आहेत. अजून काही दिवस असेच अती जड वाहने जात राहिल्यास रस्ते पांदण रस्त्यापेक्षा खराब होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने तळेगाव रस्ता मंजूर व हॉट मिक्स करून घेतला होता. परंतु वाळू वाहतुकमुळे हा रस्ता खचला आहे. या रस्त्यावर दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. हे ट्रक तळेगावातील मुख्य रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने शाळकरी मुले आणि व्यावसायिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. 

मोठे वाळूचे कंत्राटदार या व्यवसायात 

उमरी तालुक्यातून तळेगावला जोडणारा हा एकमेव रस्ता असून सदर रस्ता वाळू वाहतुकीमुळे खराब झाल्यास संपूर्ण गावाचा संपर्क तुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अलीकडील काळात शासनाला वाळूच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळत आहे. या कोट्यावधींचा महसूलात मोठे वाळूचे कंत्राटदार या व्यवसायात उतरत आहेत. यातूनच सात ते दहा हजार ब्रासपर्यंत वाळूची वाहतूक उमरी बळेगाव रस्त्यावर होत आहे. रेतीचा व्यवसाय सुरू झाल्यापासून एक महिन्यात रस्त्याची चाळण झाली आहे.

स्ता रुंदीकरण करून हॉटमिक्स पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्त करावा 

उमरी ते बळेगाव रस्ता रुंदीकरण करून हॉटमिक्स पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्त करावा लागणार आहे. तरच किमान पाच- दहा वर्षात तरी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. उमरी ते बळेगाव रस्त्यावरील तळेगावातून जाणारे वाळू वाहतुक करणारे हायवा ट्रकची वाहतूक बंद करावी व खराब झालेले रस्ते आठ दिवसाच्या आत दुरुस्त करावी अन्यथा ता. २० ऑक्टोबर रोजी तळेगावच्या मुख्य मार्गावर रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा डॉक्ट. विक्रम देशमुख तळेगावकर, जिल्हा परिषद सदस्या ललिता यलमगोंडे, उपसरपंच रूपाली उडतेवार, सरपंच शेख महंमद नवाज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, भोकर उपविभागीय अधिकारी धर्माबाद व तहसीलदार उमरी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com