नांदेड : एक तलवार व दोन खंजरसह तिघांना अटक 

प्रल्हाद कांबळे
Monday, 26 October 2020

हे तरुण घातक शस्त्र दाखवून परिसरात दहशत पसरवत होते. त्यांच्याविरुद्ध शहराच्या नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. यादरम्यान विनापरवाना बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व खांजर जप्त केले. हे तरुण घातक शस्त्र दाखवून परिसरात दहशत पसरवत होते. त्यांच्याविरुद्ध शहराच्या नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस कर्मचारी प्रमोद कराळे हा आपल्या सहकाऱ्यांसह ढवळे कॉर्नर परिसरात गस्त घालत होते. शनिवारी (ता. २४) रात्री आठच्या सुमारास जयभीमनगर नांदेड येथील श्याम गुणाजी गायकवाड (वय २५) हा आपल्या हातात विनापरवानगी खंजर घेऊन ढवळे कॉर्नर परिसरात असलेल्या एका आमलेटच्या गाड्यासमोर दहशत पसरत होता. येणाऱ्या जाणाऱ्याला तो धाक दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच प्रमोद कराळे यांनी त्याठिकाणी जाऊन श्याम गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक खंजर जप्त केले. श्याम गायकवाडविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री संगेवार करत आहेत.

हेही वाचा हिंगोलीत दसरा महोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने 

वसरणी भागातून तलवार जप्त 

दुसऱ्या घटनेत पोलिस हवालदार चंद्रकांत स्वामी आपल्या साथीदारांसह वसरणी परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना शुभम दत्ता वाघ (वय १९) राहणार मुक्तेश्वरनगर, वसरणी हा तलवार घेऊन आढळला. त्याच्याकडून तलवार जप्त केली. चंद्रकांत स्वामी यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक श्री. सूर्यवंशी करत आहेत.

येथे क्लिक कराहल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल -

जना कौठा भागात खंजर जप्त

तर तिसऱ्या घटनेत फौजदार शेख असद हे जुना कौठा परिसरात गस्त घालत असताना अजय गोविंद परमार (वय २६) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून विनापरवाना एक खंजर जप्त केली. त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक श्री. सातारे करत आहेत. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन खंजर व एक तलवार जप्त केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलिस निरीक्षक प्रदीप देशपांडे यांनी कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Three arrested with a sword and two daggers nanded news