नांदेड : सव्वादोन लाखाचे दागिणे लंपास 

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 September 2020

दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना ‘वात्सल्य’ निवास श्रीनगर परिसरात ता. एक ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान घडली आहे.

नांदेड : कपाटात ठेवलेले सोन्याचे सव्वादोन लाखाचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना ‘वात्सल्य’ निवास श्रीनगर परिसरात ता. एक ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान घडली आहे. यामुळे श्रीनगर भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीनगर भागात राहणाऱ्या सहशिक्षिका शबनम विठ्ठलराव दुथडे (वय ५०) यांनी एक सप्टेंबर रोजी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी आपल्या अंगावर सर्व दागिणे घालून त्यांनी वाढदिवस साजरा केला. यानंतर भोजन करुन त्यांनी आपल्या अंगावरील दागिणे काढून कपाटात ठेवले. मात्र त्यांनी कपाट बंद केले नाही. परिवारासह त्या झोपल्या. 

हेही वाचा -  आमदार भीमराव केराम यांची या समितीवर निवड -

घरफोडी झाल्याचे शबनम दुथडे यांनी पोलिसांना सांगितले

मात्र त्यांच्या घरात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घुसून कपाटातील दहा तोळे सहा ग्राम वजनाचे दोन लाख १८ हजाराचे दागिणे लंपास केले. ही बाबता. दोन सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी घरात सर्वत्र दागिण्यांचा शोध घेतला. मात्र दागिणे चोरीला गेल्याने कुठेच सापडले नाही. शेवटी त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. आपल्याकडे घरफोडी झाल्याचे शबनम दुथडे यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी त्यांची तक्रार घेऊन घटनास्थळ गाठले. 

भाग्यनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

पोलिस निरीक्षक अभिमन्यु सोळंके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी श्रीनगर भागात जावून पाहणी केली. पोलिसांच्या श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांनी कुठला माग मागे ठेवला नव्हता. त्यामुळे श्‍वान पथकाला खाली हात परतावे लागले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. नरवाडे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Twelve lakh jewelery lamps nanded news