नांदेड : पित्याच्या उपचारासाठी लेक विकतेय हातगाड्यावर भाजीपाला

file photo
file photo

नांदेड : एकीकडे नवजात कन्येला गर्भातच मारुन टाकणारी विकृती दिवसेंदिवस वाढत आहे, त्या मागे वंशाला दिवा हवा ही मानसिकता कारणीभूत आहेच. परंतु या विकृत मानसिकतेचा बुरखा फाडणारे उदाहरण समोर आले आहे. आपल्या आजारी पित्याच्या उपचारासाठी एकुलत्या एक लेकीनेच आधार देत हातगाड्यावर भाजीपाला विकून संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे ही कन्या बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असून पित्याच्या आजारामुळे शिक्षणात खंड पडल्याची खंत तिने बोलून दाखविली.

शिवाजीनगर ते तरोडा या भागात दररोज हातगाड्यावरुन भाजीपाला विक्री करणारी एकमेव तरुणी आहे ती म्हणजे ज्योत्सना विजय काळे. ती मूळची किनवट तालुक्यातील वझरा बुग़ावची. वडिल विजय गावातच शेतमजुरी करायचे. आई सौ.लक्ष्मीबाई गृहिणी. विजय व लक्ष्मी यांच्या पोटी ज्सोत्सनाचा जन्म झाला. ती एकुलती एकच. एकीकडे समाजात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असतानाच आणि वंशाला दिवा हवाच तो ही मुलाच्या रुपानेच. अशा विकृत मानसिकतेचे समर्थक समाजात वाढत असताना काळे परिवारातील ज्योत्सनाने मात्र पित्याला किडनीचा आजार जडल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुढाकार घेतला.

वडिल विजय यांना आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावे लागते. किनवटवरुन ये जा करणे परवडणारे नसल्यामुळे या कुटुंबाने नांदेडच्या शिवाजीनगरात किरायाने खोली घेतली. त्यामुळे तिनेही नांदेडलाच राहायचा निर्णय घेतला. राकाँचे नेते प्रदीप नाईक यांच्या दहेली तांडा येथील संगीतादेवी कनिष्ठ महाविद्यालयातून तिने गत वर्षी बारावी कला शाखेतून पूर्ण केले तेही ६५ टक्के गुणांनी. परंतु वडिलांच्या आजारपणामुळे तिला पुढील शिक्षण व करियरवर पाणी सोडावे लागले. आजारपणामुळे वडिलांना फारशी हालचाल करणे शक्य नसल्याने त्यांना हातभार म्हणून ज्योत्सनाने संसाराच्या गाड्याचे सारथ्य स्वीकारले. दररोज पहाटे पाच वाजता उठणे, वडिलांना सोबत घेऊन इतवारा भाजीपाला ठोक बाजारात जाणे आणि भाज्यांची निवड करुन बोली लावून खरेदी करणे, सकाळी सातपासून सायंकाळी सातपर्यंत नांदेडच्या शिवाजीनगर, महावीर सोसायटी, अरविंदनगर, नारायणनगर, आंबेडकरनगर, जयभीमनगर, गणेशनगर, पावडेवाडी नाका, यशवंतनगर, मयूरविहार कॉलनी, काबरानगर परशुराम चौक, पूर्णा रोड, तरोडा चौकापर्यंत भाजीपाल्याचा हातगाडा नेत तिची वणवण भटकंती सुरु असते.

कधी कधी पूर्ण भाजीपाला विकला जातो तर कधी निम्माच विकला जातो. त्यातून संसाराचा खर्च भागविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ज्योत्सनाने सांगितले. सुदैवाने महात्मा फुले जीवनदायी योजनेतून वडिलांच्या उपचाराचा खर्च होत असल्याने नांदेडसारख्या ठिकाणी राहणे, जीवन जगणे काहीसे शक्य होत आहे, अन्यथा काही खरे नव्हते, असेही तिने सांगितले. परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे दुसरे मोठे साधन नसल्याने आपण हातगाड्यावर भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. त्यातून कसाबसा संसाराचा गाडा हाकला जात असल्याचे तिने सांगितले.आपले पुढील शिक्षण व करियर रखडल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com