नांदेड : जिल्‍ह्यात गुरुवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार- वर्षा ठाकूर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 14 October 2020

त्‍याअनुषंगाने जिल्‍हयातील सर्व ग्राम पंचायतीमधून जागतिक हातधुवा दिन साजरा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

नांदेड - स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्‍यात येणा-या स्‍वच्‍छतेच्‍या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्‍वच्‍छतेसाठी हात धुणे हा एक महत्‍वाचा भाग आहे. जनतेच्‍या स्‍वच्‍छतेविषयी जाणीवा समृध्‍द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जिवनासाठी जागतिकस्‍तरावर गुरुवारी (ता. 15) ऑक्‍टोबर हा दिवस दरवर्षी हातधुवा दिन म्‍हणून साजरा केला जातो. त्‍याअनुषंगाने जिल्‍हयातील सर्व ग्राम पंचायतीमधून जागतिक हातधुवा दिन साजरा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ( घुगे) यांनी दिली आहे.

हातधुवा दिनाच्‍या संकल्‍पनेला धरुन अन्‍न स्‍वच्‍छता, हातधुण्‍याच्‍या महत्‍वाच्‍या वेळा विशेषतः स्‍वयंपाक करण्‍यापूर्वी, स्‍वयंपाक झाल्‍यावर, शौचाहून आल्‍यावर, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्‍यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्‍यानंतर, झाडझुड केल्‍यानंतर, पाळीव प्राणीमात्रांना स्‍पर्श केल्‍यानंतर, आजारी व्‍यक्‍तीच्‍या भेटी पूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्‍यानंतर साबणाने हात धुणे आवश्‍यक आहे. या संदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्‍यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात येणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.

हेही वाचा -  स्लोमोशनमुळे मोठा अपघात टळला, सचखंडचे तीन डब्बे निसटले -

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्‍यासाठी नियमित हात साबणाने स्‍वच्‍छ धुणे आवश्‍यक

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्‍यासाठी नियमित हात साबणाने स्‍वच्‍छ धुणे आवश्‍यक आहे. मास्‍क, सॅनिटायझरचा वापर व दोन व्‍यक्‍तींमधील सुरक्षित अंतर या त्रिसुत्रिचा वापर करण्‍यासाठी जागृती केली जाणार आहे. गावस्‍तरावर गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, विस्‍तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षीका, आरोग्‍य सेवक, आरोग्‍य कर्मचारी यांच्‍या पुढाकारातून जागतिक हात धुवा दिवस साजरा केला जाणार आहे.

यांनी हा दिवस साजरा करावा 

यासाठी लोक‍प्रतिनिधी, महिला बचतगट, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, स्‍वच्‍छागृही, माविमच्‍या संयोगिनी, युवक- युवती, स्‍वयंसेवी संस्‍था आदींनी सहभागी होऊन हा दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे) यांनी केले आहे.

येथे क्लिक करामोठी बातमी : अतिवृष्टीचा धोका, या आठवड्यात अशी घ्या काळजी- प्रदीप कुलकर्णी -

स्‍वच्‍छ हात कसे धुवावेत

हात धुण्‍यासाठी साबणाचा वापर करावा. प्रथम हात पाण्‍याने ओले करुन त्‍यावर साबण घासावी. दोन बोटामधील जागा तसेच नखांच्‍या खालचा भाग व मनगटे घासावी. हात धुण्‍याची प्रक्रिया कमित कमी 20 ते 30 सेंकदापर्यंत चालणे आवश्‍यक आहे. हात धुवुन झाल्‍यानंतर स्‍वच्‍छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे. आपल्‍या मुलांसमोर किंवा शाळेत विद्यार्थ्‍यांसमोर आपण वारंवार हात धुल्‍यास मुले ते पाहून पाहून शिकतील.

असे आहेत हानिकारक किटाणू

अस्‍वच्‍छ हाताला स्‍पर्श केल्‍यास. दुषित पाणी किंवा अन्‍नातून, खोकल्‍यातून किंवा शिंकेतून बाहेर पडणा-या हवेव्‍दारे, आजारी व्‍यक्‍तीच्‍या शरीर द्रव्‍याच्‍या संपर्कात आल्‍यास.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: World Handwashing Day will be celebrated in the district on Thursday nanded news