esakal | बाप्पाला निरोप देण्यासाठी नांदेडकर सज्ज... 
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड महापालिकेने पासदगाव आणि आसना येथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केला आहे.

नांदेड महापालिकेने पासदगाव आणि आसना येथे यंदाही कृत्रिम तलाव केला असून, या ठिकाणी संकलित केलेल्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर झरी येथील नानकसर गुरुद्वाराजवळ असलेल्या तलावातही क्रेनच्या सहाय्याने मूर्ती विसर्जित करण्यात येणार आहेत.

बाप्पाला निरोप देण्यासाठी नांदेडकर सज्ज... 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नदी घाटावर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनासह नांदेड महापालिकेने तयारी केली आहे. महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १४ ठिकाणी श्री मूर्ती संकलन केंद्र कार्यान्वित केली आहेत. त्याचबरोबर पोलिस विभागानेही विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्तासह शहरातील वाहतूक व्यवस्थेतही बदल केला आहे. 

शहरातील गोदावरी आणि आसना नदीच्या घाटावर जीवरक्षकांसह नाव, विद्युत व ध्वनिक्षेपन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. ‘श्रीं’चे निर्माल्य इतरत्र टाकू नये, तर ते संकलन गाडीतच टाकून महापालिका प्रशासनास व निसर्ग संवर्धनास सहकार्य करावे, तसेच कोरोना संसर्गापासून बचाव करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. 

हेही वाचा - पतीची क्रुरता : पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न 

दोन कृत्रिम तलावाची निर्मिती
नांदेड महापालिकेने पासदगाव आणि आसना येथे यंदाही कृत्रिम तलाव केला असून, या ठिकाणी संकलित केलेल्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर झरी येथील नानकसर गुरुद्वाराजवळ असलेल्या तलावातही क्रेनच्या सहाय्याने मूर्ती विसर्जित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता गिरीश कदम यांनी दिली. 

नांदेडला १४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चक्रधरनगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चैतन्यनगर साईबाबा मंदिर परिसर, महाकालीदेवी मंदिर परिसर, वर्कशॉप पाण्याची टाकी, महाराणा प्रताप चौक व मगनपुरा येथील स्वामी समर्थ मंदिरात, सन्मित्र कॉलनीतील हनुमान मंदिर परिसर, बजाज नगरातील हनुमान मंदिर परिसर, विजयनगरमधील हनुमान मंदिर परिसर, पावडेवाडी नाका, आयटीआय कॉर्नर आणि कोठारी कॉम्प्लेक्स, तर जुना मोंढा येथील महाराणा प्रतापसिंह व्यापारी संकुल, तर सिडकोत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात संकलन केंद्र सुरू केले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमधील शेतकरी, प्लॉटधारक का आहेत आत्मदहनाच्या तयारीत, घेतली आमदाराची भेट -
 
संकलन केंद्रावर मूर्ती द्या ः पालकमंत्री अशोक चव्हाण 

गेले पाच महिने कोरोनाच्या काळात कोरोनाशी लढत जनतेने गणेशोत्सव, मोहरम- ताजिया, बुद्धपौर्णिमा, बकरी ईद यांसारखे सण, उत्सव संयमाने पार पाडले आहेत. जो विवेक जिल्ह्यातील जनतेने दाखविला आहे त्याच विवेकाच्या बळावर काळजी घेत बाप्पाला निरोप देऊयात. सद्यःस्थिती आव्हानात्मक असून, कोरोनाची लस उपलब्ध होईपर्यंत सर्वजण अधिक कर्तव्य दक्षता बाळगतील, असा विश्वास पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच प्रशासनाने केलेल्या संकलन केंद्रावर जनतेने गणेशमूर्ती सुपूर्द कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.