नांदेडचा ओबीसी मैदानात
नांदेडचा ओबीसी मैदानात

राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी नांदेडचा ओबीसी समाज मैदानात

वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असणार्‍या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरुन धोक्यात आलेले आहे.

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या व इतर मागण्यांसाठी ओबीसीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असणार्‍या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरुन धोक्यात आलेले आहे. ता. 4 मार्च, 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ’विकास किशनराव गवळी वि. महाराष्ट्र सरकार (रिट याचिका क्र. 980/2019)’ या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरविले. याबाबतची राज्यसरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ता. 28 मे रोजी फेटाळली आहे.

हेही वाचा - "कौडगाव" अवैध वाळू उपसा प्रकरण; तहसीलदार परळीकर यांनी दाखल केला गुन्हा

राज्यशासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयात भक्कमपणे ओबीसींची बाजू मांडली असती, तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. तरी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द न होता अबाधीत राहिलेच पाहिजे. याची दक्षता व कार्यवाही राज्यशासनाने करावी. महाराष्ट्र शासनाच्या या अतिशय महत्त्वाचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दिरंगाई केली. याला महाराष्ट्र शासन आणि विशेषत: ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून आम्ही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतो.

वरील निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ’नागरिकांच्या मागास प्रवर्गा’चे (ओबीसींचे) आरक्षणच धोक्यात आलेले आहे. ’महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961’ मधील सेक्शन 12(2)(क)मध्ये नागरिकांच्या मागासवर्गाच्या आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार के. कृष्णमूर्ती वि. भारत सरकार या खटल्याच्या निकालात नमूद केलेल्या तीन अटींची पूर्तता राज्यशासनाने फार पूर्वीच करणे आवश्यक होते. जेणेकरुन ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले नसते. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाने स्वतंत्र व समर्पित आयोग त्वरीत गठीत करुन राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) मागासलेपणाचे स्वरुप, परिणाम आणि लोकसंख्येचे प्रमाण याबाबत समकालिन सखोल आणि अनुभवजन्य माहिती गोळा करावी. आणि आयोगाच्या शिफारशींच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार आरक्षणाचे प्रमाण निश्चित करून ते पुनर्स्थापित करावे. ज्या ज्या वेळी ओबीसींच्या सवलतींचा मुद्दा पुढे येतो. त्या त्या वेळी ओबीसींच्या निश्चित लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते.

येथे क्लिक करा - आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा

विधानसभेने एकमताने पारित केलेल्या जातनिहाय जनगणनेबाबतच्या ठरावानुसार केंद्र सरकार जनगणना करीत नसेल तर राज्य शासनाने राज्याची जातनिहाय जनगणना करावी. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 2797/2015 प्रकरणी ता. 4 ऑगस्ट, 2017 रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरविले असले तरी या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिली नसल्याने पदोन्नतीच्या कोटयातील मागासवर्गीयांची 33 टक्के आरक्षित पदे भरण्यात यावीत. महाराष्ट्र शासनाने ता. 7 मे, 2021 रोजीचा तडकाफडकी काढण्यात आलेला शासन निर्णय हा संविधानविरोधी असल्याने तो पूर्णत: विनाविलंब रद्द करण्यात यावा. महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम 2001 या महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण अधिनियमामध्ये पदोन्नतीमधील आरक्षण देण्याची तरतूद आहे. व त्यानुसार ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे.

यावेळी ओबीसीचे नामदेव आयलवाड, गोविंद फेसाटे, प्रा. दिलीप काठोडे, नवीन राठोड, दिनकर दहीफळे, व्यंकटेश जिंदम, विजय देबडे, प्रकाश राठोड, आर. के. दाभडकर, पी. पी. बंकलवाड, गोविंदराव शुरनर, भुमन्ना आक्केमवाड, रोहिदास जाधव, डॉ. कैलास यादव, हनमंत सांगळे, नंदकुमार कोसबतवार, रामेश्वर गोडसे, रामराव भाटेगावकर, रवींद्र बंडेवार, संदीप जिल्हेवाड, ललिता कुंभार, चंद्रकला चापलकर, पद्मावती झंपलवाड, अरुणा पुरी, दैवशाला पांचाळ, वामनराव पेनूरकर, संतोष औंढेकर, विनोद सुत्रावे, नागनाथ पांचाळ, नागनाथ महादापुरे, दत्ता चापलकर, शंकरराव नांदेडकर यांच्यासह ओबीसी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com