चिंचोर्डीत शेकडो कोंबड्याचा अज्ञात रोगाने मृत्यू, Bird Flu असल्याचा संशय

प्रकाश जैन
Monday, 11 January 2021

एकाच वेळेस शेकडोच्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होणे चिंता वाढवणारी आहे.

हिमायतनगर (जि.नांदेड) : तालुक्यातील चिचोर्डी येथे अज्ञात रोगाने शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना आज (11) सकाळी उघडकीस आली. एकाच वेळेस शेकडोच्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होणे चिंता वाढवणारी आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे चिंचोर्डी येथील प्रसाद माधव झिंगरे, भारत रामजी झाडे, नागोराव गोमाजी ढोले हे अल्पभूधारक शेतकरी कोरडवाहू शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडे पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर बाहेर चरुन आलेल्या कोंबड्या दि. 10 रविवारी खुराड्यात डाळून ठेवल्या. दि. 11 सोमवारी सकाळी  परत बाहेर सोडण्यासाठी खुराडे उघडले असता सर्वच कोंबड्या ह्या मृत अवस्थेत आढळून आल्या.

एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडणे हे चिंतेची ठरणारी बाब असून बर्डफ्युल्यूचा संभाव्य धोका आहे की काय? अशी काळजी वाहू प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर यावर्षी येणारी संक्रांत कोंबड्यावरच आली असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

याबद्दल आता पर्यावरणप्रेमींतून चिंता व्यक्त केली जात आहे. याविषयी हिमायतनगरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता ते म्हणाले की, चिंचोर्डी येथिल गावकऱ्याच्या कोंबड्या मृत पावल्या अशा संदर्भाचा फोन आला आहे. मी चौकशीकरिता जात आहे. तसेच या अगोदर हिमायतनगर व घारापूर येथील शेतकऱ्यांच्या कोंबड्याचे नमुने पुण्याच्या लॅबला तपासणी कामी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number Of Hens Died Unknown Disease Nanded Latest News