अरे बापरे...! चक्क रक्ताच्या शाईद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, काय आहे ्प्रकरण वाचा...

प्रल्हाद कांबळे
Thursday, 13 August 2020

गोपाळचावडी येथे राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व धनगर समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी रक्ताने लिहिलेले निवेदन निवासी जिल्हा अधिकारी सचिन खल्लाळ यांना देण्यात आले...

नांदेड : प्रियंका गोविंद गोरे या धनगर समाजाच्या बालिकेने स्वत: च्या रक्ताने निवेदन लिहून निवासी जिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा लवकरच निर्णय घ्यावा. धनगर समाजाच्या २२ योजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी, मेंढपाळांना संरक्षण द्यावे व तसेच नांदेड शहरातील अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशा विविध मागण्या केल्या आहेत. 

यावेळी उपस्थित धनगर समाज युवा मल्हार सेना राज्याचे सरचिटणीस बालाजी पाटील नारे, अॅड. माणिकराव वाखरडे, धनगर समाज युवा मल्हार सेना राज्याचे प्रसिद्धीप्रमुख बालाजी काकडे, नांदेड जिल्हा सरचिटणीस नवनाथ काकडे, श्री. खटके, दिगंबर सुरनर, तालुकाप्रमुख साहेबराव मैलगे, बळीराम सरोदे, शंकर दिवटे, बळी महाराज, हनुमंत मैलगे, महेश दिवटे, श्री. डाके मामा, पुंडलिक दिवटे, योगेश मैलगे आदिंची उपस्थिती होती.

 हेही वाचा -  मुखेड खून प्रकरण : आरोपीला तेलंगणात सिनेस्टाईल अटक, कोठडी

हजारो मंदिरांची स्थापना तसेच जीर्णोद्धार केला

अठराव्या शतकात निर्भिडपणे राज्यकारभार चालवणाऱ्या महाराणी अहिल्यादेवी या एक उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी आर्थिक स्थितीचा विचार करून कर पद्धतीमध्ये जनतेला सवलत दिली. त्यांनी नर्मदाकिनारी महेश्वर येथे राजधानी वसवली आणि इंदौर शहरास आर्थिक व व्यापारी केंद्र म्हणून उदयास आणले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी हजारो मंदिरांची स्थापना तसेच जीर्णोद्धार केला. अनेक तीर्थक्षेत्री घाट, अन्नछत्रे व धर्मशाळा बांधल्या. मोठे रस्ते, विहीरी (बारवे) आणि निवासस्थाने बांधून प्रवासी व व्यापारी यांची सोय केली.

अठराव्या शतकातील जगातील सर्वोत्तम महिला शासक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय एखाद्या जातीपुरता न करता समस्त हिंदूस्थानच्या गौरवशाली इतिहासाचा तो विषय झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. भारतीय स्त्रीसबलीकरणाचे सर्वात प्रभावी प्रतिक म्हणून अहिल्यादेवींकडे आपण पहायला हवे. ब्रिटिश पार्लमेंटने अहिल्यादेवींना, "अठराव्या शतकातील जगातील सर्वोत्तम महिला शासक" म्हणून गौरविले आहे. कवयित्री जोआना बेली हिने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले आहे. युरोपियन स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रेरणा अहिल्यादेवी बनलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my God ...! A statement to the Collector through blood ink, read the case nanded news