पालकांनो सावधान ! आपली मुले गॅझेटच्या दुनियेत रमलीतर नाही ना? 

प्रमोद चौधरी
Sunday, 4 October 2020

सद्यस्थितीत भरकटत चाललेल्या नव्या पिढीला गॅझेटमधून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पालकांना स्वीकारावे लागणार आहे.

नांदेड : आज लहान मुलांची पिढी ही नक्कीच हुशार आहे; पण फक्त गॅझेटच्या दुनियेतच. दिवस रात्र आजची पोरं या गॅझेटला चिटकून असतात. पूर्वी जे गेम मित्रांसोबत मैदानात खेळले जायचे, ते गेम आता मोबाईलवर आलेत. परिणामी भरकटत चाललेल्या या पिढीला गॅझेटमधून बाहेर काढण्याचे आता प्रथम कर्तव्य बनले आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते  दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले.  

काळ जसा बदलत गेला तसे खेळाचे प्रकारही बदलत गेले. विटीदांडू, लगोरी, भोवरा, लपंडाव यांसारखे खेळ हद्दपार होऊन त्यांची जागा मोबाईल गेमने घेतली. उन्हाळ्याच्या सुट्टीत आता मुले मैदानी खेळाऐवजी टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न होतात. व्हिडीओ गेम्स हे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे आहेत. या गेम्सद्वारे बुद्धीला चालना देणारे, निखळ मनोरंजन करणारे व शैक्षणिकदृष्टया सुद्धा चांगले आहेत. तसेच शास्त्रंज्ञानी व्हिडीओ गेम्स खेळण्याचे अनेक फायदे सुद्धा सांगितले आहेत. या गेम्समुळे मेंदु, डोळे, हात यांचा समन्वय वाढतो आणि क्रिया जलद होते, संगणक वापरण्याची कौशल्य वाढते तसेच गती जलदपणे होते व मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास चालना मिळते परंतू ज्याप्रमाणे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा वाढत आहेत. 

हेही वाचा - जिल्ह्यातील मृत्यूची मालिका थांबेना, शनिवारी आठ रुग्णांचा मृत्यू; १४० जण पॉझिटिव्ह

मुलांमध्ये न्यूनगंड वाढतो
आजकालच्या लहान मुलांना गेम खेळण्यास मनाई केली तर त्यांची अतिशय चिडचिड होते, बैचेनी वाढते व मुले दुःखी होतात. अशा या मानसिकतेला गेम्सचे व्यसन असेच म्हणता येईल व ही खुप गंभीर बाब आहे. लहान मुलांचं रुसणं, वेळेवर न जेवणे, कमी झोप असे प्रश्न पालकांना आज सतावत आहे. पण या आधुनिक मोबाइल आणि टीव्हीमुळे मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होत असून प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. परिणामी मुलांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.

हे देखील वाचाच - गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार, प्रवाशांना दिलासा

चांगल्या गोष्टींची सवय लावणे आवश्‍यक  
अशा विचित्र परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पालकांनीच आधी मोबाइलमधून बाहेर पडण्याची गरज आहे. मुलांना नुसते व्हिडीओ गेम्स न देता दुस-या चांगल्या  गोष्टींची सवय सुद्धा लावणे गरजेचे आहे.  पूर्वी मुलांच्या ज्ञानात भर पडेल असे बोधकथा, गोष्टीची पुस्तके किंवा इतिहासाच्या गोष्टी, विचारधन, कोडी, चित्रकला, ज्ञानमंजुशा या सर्व गोष्टींची जागा आता गॅजेटने घेतली आहे. लहान मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सोशल मिडियाचा वापर करण्यावर अधिक भर पडतो आहे.   

हे वाचलेच पाहिजे - कांद्याचे भाव वधारल्याने ” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ

मैदानी खेळांतून ऊर्जा मिळते
लहान मुलांनी धावत्या जगाबरोबर धावणे ही काळाची गरज असली तरी; लहान वयात ज्या खेळाबदल आकर्षण असायला हवे ते खेळ खेळणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन मैदानी खेळातून मुलांना व्यायाम हा मिळतोच. तोच दररोज मिळणारा व्यायाम मुलांच्या दिर्घायुष्यासाठी अधिक महत्वाचा आहे. इंटरनेटवरच्या खेळांपेक्षा अस्सल मातीतल्या खेळांमध्ये किती धम्माल असते, ती पाहण्यासाठी मुलांनी थोडं मैदानाकडे फिरकायला हवं.  कमीत कमी सोसायटीच्या आवारात तरी रोज किमान दोन तास खेळलं पाहिजे. लहान मुलांच्या विकासात खेळाचं अनन्यसाधारण महत्व आहे. खेळ ऊर्जा निर्माण करतो अन आतल्या उर्जेला योग्य वाटही करून देतो. 

काळ बदलला तशी आव्हानेही वाढलीत
पूर्वीचे सर्व चांगलं आणि आता बदलत्या जीवनशैली, तंत्रज्ञान, गतीमान जीवन यामुळे सगळं वाईट होतंय असं काही नाही. काळ बदलला तशी आव्हाने वाढली व यावर मात करायला या नव्या गोष्टी, तंत्र याचा स्वीकार करावाच लागेल. मात्र लहानांची निरागसता, त्यांची वाढ, मुल्यशिक्षण, संस्कारक्षमता, निसर्गाशी जवळीक जपताना सध्याचे तंत्रज्ञान अन जीवनशैली याचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी पालकांची आहे.
- दिलिप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents The Create Positive Energy In Children Nanded News