नांदेडहून मुंबई, अमृतसर विमानसेवा सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Patil and Pritam Munde

नांदेडला २००८ मध्ये ९४ कोटी रुपये खर्च करून नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

Plane Service : नांदेडहून मुंबई, अमृतसर विमानसेवा सुरू करण्याची मागणी

नांदेड - नांदेड-मुंबई, नांदेड-दिल्ली-अमृतसर तसेच पुणे व हैदराबाद येथेही विमानसेवा सुरू करण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मुंबईपासून नांदेड हे सहाशे किलोमीटरवर आहे. नांदेड जिल्हा तीन राज्यांच्या सीमांना लागून आहे. शिवाय नांदेड शहरापासून परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, बीड हे जिल्हे शंभर किलोमीटरवर आहेत. तेलंगणा राज्याचे आदिलाबाद, निजामाबाद, बोधन, निर्मल, कर्नाटकचे बिदर, गुलबर्गा या शहराचे अंतरदेखील शहरापासून शंभर किलोमीटर इतके आहे. गुरुद्वारा दर्शनासाठी दिवसाला पाच हजार भाविक शहरात येतात.

नांदेडला २००८ मध्ये ९४ कोटी रुपये खर्च करून नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पूर्वी एअर इंडिया, किंगफिशर, इंडिगो, बोइंग या कंपन्यांमार्फत दररोज आणि आठवड्यातील ठराविक दिवस अशा दोन्ही पद्धतीच्या मुंबई, दिल्ली, अमृतसर, चंदीगड, तिरुपती, हैदराबाद शहरासाठी विमानसेवा पुरविली जात असे. काही दिवसांनी या सेवा बंद झाल्या. त्यामुळे दिल्ली, अमृतसरसह देश-विदेशातून गुरुद्वाऱ्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.