नांदेडला खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

अभय कुळकजाईकर
Wednesday, 23 September 2020

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरासमोर हे आंदोलन बुधवारी (ता. २३ सष्टेंबर) करण्यात आले.

नांदेड - देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (ता. २३ सष्टेंबर) नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी शिंदे आणि ॲड. धोंडिबा पवार यांच्या नेतृत्वाखाली राखरांगोळी आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अगोदरच शेतकरी संघटनेचे प्रवक्ते शिवाजी शिंदे यांनी सांगितले होते.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात पहाटेपासूनच मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

शेतकरी आर्थिक संकटात 
सहा महिने शेतकऱ्यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरून निघेल, असे भाव मिळू लागले आहेत. तोच कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटले आहे. निर्यातबंदी घालून शेतकऱ्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी केली आहे. शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते, परंतु शेतकऱ्यांनी निवडून दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी होत असल्याची कल्पना देण्यासाठी बुधवारी नांदेड जिल्ह्यात दोन खासदारांच्या घरासमोर ता. १४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून राख केली व कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने केले.

निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात 
यावर्षीच जून महिन्यात केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार कायद्यात दुरूस्ती करून शेतीमाल व्यापार खुला करून कुठेही विकण्याची परवानगी दिली, कांदा आवश्यक वस्तू कायद्यातून वगळला आहे. शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंबासुद्धा दिला होता, पण तीनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. देशात तसेच विदेशातही कांद्याला चांगली मागणी असताना केलेली निर्यातबंदी ही शेतकऱ्यांबरोबर निर्यातदारांचेही मोठे नुकसान करणारी ठरली असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचलेच पाहिजे - परभणीत जुन्या जलवाहिण्यांवरील पाणी वितरण होणार बंद

निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा

जागतिक कांदा बाजारात एकेकाळी ८० टक्के असलेला भारताचा वाटा ४० टक्क्यावर आला आहे. एकूण देशाच्या व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा अन्यथा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी शिंदे यांनी सांगितले. दुपारी एक वाजता कार्यकर्ते झेंडे व फलक घेऊन खासदार हेमंत पाटील आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी पोहचले व कांदा निर्यातबंदी अध्यादेशाची होळी करून कांद्याची रांगोळी काढली. यावेळी गोदावरी बॅंकेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी निवेदन स्विकारले. तसेच दुसरीकडे खासदार चिखलीकर यांचे स्वीय सहायक जाधव यांनी निवेदन स्वीकारुन खासदार चिखलीकर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद करून दिला. यावेळी श्री चिखलीकर यांनी जीआर उठवण्याचे आश्वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhrangoli agitation of farmers' association in front of MP's house in Nanded, Nanded news