नांदेडला खरिपाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्याखाली

अभय कुळकजाईकर
Thursday, 5 November 2020

नांदेड जिल्ह्यातील खरिपाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्याखाली आली आहे. जिल्ह्यातील सर्वच एक हजार ५६२ गावांचा त्यामध्ये समावेश आहे. मागील वेळेस पन्नास पैशावर नजरी पैसेवारी आली होती. आता अंतिम पैसेवारीनंतर नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

नांदेड - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२० - २०२१ या वर्षाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच एक हजार ५६२ गावांचा समावेश आहे. यापूर्वी नजर अंदाज पैसेवारी पन्नास पैशावर जाहीर झाली होती. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
 
जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप हंगामाची पैसेवारी कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेकडून करण्यात आलेल्या पीक पाहणी प्रयोगाच्या आधारावर जाहीर करते. यात ता. ३० सप्टेंबर रोजी नजर अंदाज हंगामी पैसेवारी, ता. ३० ऑक्टोंबर रोजी सुधारित पैसेवारी तर ता. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. या पैसेवारीच्या निकषावर जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचा तसेच उत्पादनाचा अंदाज गृहीत धरला जातो.

 

हेही वाचा - साडेचारशे कोरोना बाधितांवर उपचार सुरु, गुरुवारी ५१ पॉझिटिव्ह, ५९ रुग्ण कोरोनामुक्त

 

३८५ कोटींची भरपाईची मागणी
नांदेड जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेवर झाल्या. परंतु पेरणीनंतर पावसाने ओढ दिली. यामुळे सोयाबीनची दोन-तीन वेळा पेरणी करावी लागली. यानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांसह बागायती व फळपिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाने ३८५ कोटींची भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. 

 

हेही वाचलेच पाहिजे -  नांदेडच्या गोदावरी तीरावर पक्षी सप्ताहाचा पक्षी निरीक्षणाने शुभारंभ

 

ता. १५ डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट

दरम्यान,  त्यानंतर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाच्या पैसेवारीकडे लक्ष लागले होते. दरम्यान, जिल्हा प्रशासानाने नुकसानीची माहिती पथकाद्वारे सर्व्हेक्षण करून घेतली. जिल्ह्यात एक हजार ५६२ महसुली गावात सात लाख ८२ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. या सर्वच गावातील सुधारित पैसेवारी पन्नास पैशाचा खाली जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता ता. १५ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अंतिम पैसे नंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The revised percentage of kharif to Nanded is below fifty paise, Nanded news