नांदेडला गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरुन लागले वाहू....

अभय कुळकजाईकर
Saturday, 29 August 2020

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यापूर्वी देखील विसर्ग करावा लागला होता. आता पुन्हा शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एक दरवाजा उघडून त्यातून विसर्ग करण्यात आला आहे.

नांदेड - गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा वाढल्यामुळे शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहा वाजता तेरा क्रमांकाचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिला आहे. 

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यापूर्वी देखील विसर्ग करावा लागला होता. आता पुन्हा शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एक दरवाजा उघडून त्यातून विसर्ग करण्यात आला आहे. एका दरवाजातून ४७१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली. 

हेही वाचा - कोरोना उपचार : बारडच्या रुपेश देशमुख यांना कोवी शील्डचा पहिला डोस 

इतर प्रकल्पातही पाणीसाठा
जिल्ह्यातील इतरही प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ५२५.७७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी ७०.४७ टक्के आहे. मानार प्रकल्पात ११०.४२ दलघमी (७९.८९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १२६.०८ दलघमी (९०.६६ टक्के) तर नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ७३.३९ दलघमी (३८.६६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ८८ लघु प्रकल्पात १३५.१० दलघमी (७०.८१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 
 
विष्णुपुरी प्रकल्पात येवा सुरू
विष्णुपुरी प्रकल्पाच्या कॅटमेंट एरियात पाऊस झाला तसेच वरील प्रकल्पही भरल्याने पाण्याचा येवा सुरु आहे. विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी ३५५ मीटर इतकी आहे. बुधवारी या प्रकल्पात ३५५ मीटर पाणी झाले. गोदावरी नदीवर असलेल्या जुन्या पुलाची धोका पातळी स्थिती ३५४ मीटर आहे. गुरूवारी सकाळी या पुलाजवळ ३४३.६५ मीटरवरुन पाणी वाहत होते. शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहा वाजता पुन्हा विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणी : जेईई- नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉग्रेस रस्त्यावर 

गोदावरी नदी भरुन लागली वाहू 
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण भरल्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये अनेकदा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. प्रकल्पाच्या वरील बाजूस पूर्णा नदीवर असलेल्या येलदरी आणि सिद्धेश्वर हे प्रकल्प देखील पूर्ण भरले असल्यामुळे त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ते पाणी पूर्णा नदीतून गोदावरीत विष्णुपुरी प्रकल्पात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी एक दरवाजा उघडण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजता दरवाजा उघडण्यात आला असून रात्री आठ वाजेपर्यंत दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच होता. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river Godavari started flooding Nanded ...., Nanded news