esakal | नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस, अवैध उपसा सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वाळू माफियांनी दोघावर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथे ता. १७ जूनच्या सायंकाळी घडला.

नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस, अवैध उपसा सुरूच

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा करून ठेवलेल्या वाळूसाठ्यासंदर्भात प्रशासनास माहिती दिल्याच्या संशयावरुन वाळू माफियांनी दोघावर प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथे ता. १७ जूनच्या सायंकाळी घडला. उपचारानंतर या प्रकरणी चार जणाविरुद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड जिल्ह्यात नांदेड शहर, लोहा, सोनखेड, देगलूर, नायगाव, मुदखेड, हदगाव, अर्धापूर, बिलोली, धर्मबाद, उमरी, कुंटूर, रामतिर्थ या पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना वाळू माफियांकडून भरमसाठ वाळू उपसा सुरू आहे. नदी घाटावर यंत्राच्या, तराफ्याच्या सहाय्याने रात्रभर वाळू उपसा सुरू आहे. वाळू ठेक्यावर महसुल किंवा पोलिस पथक गेले तर त्यांच्यावर सुद्धा हल्ले करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील वाळू माफियांनी पवित्र असलेल्या नद्यांचे पात्र दुषीत केले आहे. एवढेच नाही तर एकीकडे पर्यावरणाची मोठी हाणी करण्यात येत आहे. तर दुसरकडे महसुल प्रशासन डोळेझाक करत आहे.

हेही वाचा -  जिल्ह्यात कोरोनाचा चौदावा बळी

अरूण डोंगरे यांनी वाळू माफियांना ताळ्यावर आणले होते

नांदेड व मुदखेड तालुक्यात वाळूचा बेसुमार उपसा करून काही महसुल व पोलिस प्रशानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन वाळू माफियांचा हैदोस सुरूच आहे. गोदावरी नदीपात्राच्या शेजारी व आजू- बाजूच्या शेतामध्ये अवैध वाळू साठे असल्याचे दिसुन येतात. मात्र त्यावर महसुल विभाग मुग गिळून गप्प आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी या वाळू माफियांना ताळ्यावर आणले होते. जप्त केलेल्या वाहनावर व त्याच्या मालक चालकावर गुन्हा दाखल करून मोठा दंड लावण्यात येत होता. आता तर पोलिस किंवा महसुलच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेले वाळू वाहतुक करणारे वाहन ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून सोडून देण्यात येत आहे. असाच एक प्रकार उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. 

दोघांवर प्राणघातक हल्ला 

ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथील वाळू माफिया विनोद दौलत गोविंदवाड, बाबाराव दौलत गोविंदवाड, अवधूत दौलत गोविंदवाड आणि दत्ता गोविंद राजेगोरे रा. पाथरड (ता. मुदखेड) यांनी ब्राम्हणवाडा येथील माधव उर्फ राजू मारोती बत्तलवाड (वय २०) आणि त्याचा भाऊ हरिदास बत्तलवाड यांना संशयावरुन मारहाण केली. आमचा वाळू साठा तहसिलदारांना का सांगितला व मागच्या गुन्ह्यात विरोधात साक्ष का दिली याचा राग मनात धरुन ब्राम्हणवाडा येथील आश्रम शाळेजवळ या दोघांना अडविले. 

येथे क्लिक करा नांदेडच्या आसना बायपास येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साध्या पध्दतीने

चार जणांवर मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

माधव बत्तलवाड याच्या उजव्या पायावर कत्तीने मारुन लोखंडी सळईने जबर मारहाण केली. तसेच हरिदास यालासुद्धा जबर जखमी केले. हल्लेखोरांनी या दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. माधव बत्तलवाड याच्या फिर्यादीवरुन वरील चार जणांवर मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड करत आहेत.