‘या’ तीन जिल्ह्यातील प्रकल्पात पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा...

अभय कुळकजाईकर
Friday, 21 August 2020

नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण १५२ प्रकल्प असून त्यात दोन हजार १८३ दलघमी म्हणजेच ७९.०३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी फक्त ३६८.१९ दलघमी (१३.३३ टक्के) एवढाच पाणीसाठा झाला होता. नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ४११.१५ दशलक्षघनमीटर म्हणजेच ५५.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात ९३४.३८ दलघमी म्हणजेच ९८.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. परभणी जिल्ह्यात नऊ प्रकल्पात ६८.८६ दलघमी म्हणजेच ६५.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

नांदेड - गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे. अनेक प्रकल्प भरले असल्यामुळे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण १५२ प्रकल्प असून त्यात दोन हजार १८३ दलघमी म्हणजेच ७९.०३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी फक्त ३६८.१९ दलघमी (१३.३३ टक्के) एवढाच पाणीसाठा झाला होता. 

नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ४११.१५ दशलक्षघनमीटर म्हणजेच ५५.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी २०१.३६ दलघमी म्हणजेच २६.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात ९३४.३८ दलघमी म्हणजेच ९८.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी १७.०८ दलघमी म्हणजेच १.८० टक्के एवढाच पाणीसाठा होता. परभणी जिल्ह्यात नऊ प्रकल्पात ६८.८६ दलघमी म्हणजेच ६५.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी ६.६० दलघमी म्हणजेच ६.२५ टक्के पाणीसाठा झाला होता.  

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे उडीद, मुगाला फुटले मोड

नांदेड जिल्ह्यात संततधार
नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प भरल्यामुळे दरवाजे उघडून पाणी सोडून द्यावे लागले. सध्या ४८.४५ दलघमी म्हणजेच ५९.९७ टक्के पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. मानार प्रकल्पात १०४.८४ दलघमी (७५.८६ टक्के) पाणीसाठा झाला आहे. नऊ मध्यम प्रकल्पात १२०.४२ दलघमी (८६.५९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा तर नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात २०.७१ दलघमी (१०.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. ८८ लघु प्रकल्पात ११६.७२ दलघमी (६१.१८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात ९८.६६ टक्के पाणीसाठा
हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणात ८०७.५ दलघमी (९९.६६ टक्के) तर सिध्देश्वर धरणात ७८.८४ दलघमी (९७.३९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. येलदरी आणि सिध्देश्वर या दोन्हीही धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्पात ४७.८० दलघमी (९०.१४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर दोन कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये ०.६९ दलघमी (२०.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमध्ये दररोज अडीच हजार शिवभोजन थाळींचे होते वाटप

परभणी जिल्ह्यात ६५.१८ टक्के पाणीसाठा
परभणी जिल्ह्यात चार उच्च पातळी बंधारे असून त्यात ६५.८९ दलघणी (६६.९० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तीन लघु प्रकल्प असून त्यात १.३७ दलघमी (३१.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असून त्यात १.६० दलघमी (५७.२२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

नांदेड जिल्ह्यात सरासरी ५३९ मिलीमीटर पाऊस
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ता. एक जून ते ता. २१ आॅगस्टपर्यंत एकूण सरासरी ५३९.८ मिलीमीटर म्हणजेच ९५.१७ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड तालुक्यात - ५२६.६ मिलीमीटर (९९.९१ टक्के), बिलोली - ४८३.३ मिमी (८४.४९ टक्के), मुखेड - ४९८.५ मिमी (१०६.०६ टक्के), कंधार - ४७८.१ मिमी (९४.७७ टक्के), लोहा - ५१७.४ मिमी (११०.८६ टक्के), हदगाव - ५९४.८ (९८.४३ टक्के), भोकर - ६६६.५ मिमी (१०९.६९ टक्के), देगलूर - ५०८.२ मिमी (१००.३२ टक्के), किनवट - ५८४.९ मिमी (८५.२५ टक्के), मुदखेड - ५३३ मिमी (९४.९९ टक्के), हिमायतनगर - ५८८.७ मिमी (९८.४१ टक्के), माहूर - ५७४.६ मिमी (७७.८४ टक्के), धर्माबाद - ५४४.७ मिमी (१००.२२ टक्के), उमरी - ५५३.८ मिमी (१०२.४४ टक्के), अर्धापूर - ५६६.९ मिमी (११०.०१ टक्के), नायगाव - ४९८.१ मिमी (११२.४४ टक्के). यंदाच्या वर्षी जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर जूननंतर जुलै आणि आॅगस्ट महिन्यातही समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे नदी, ओढे, नाले यांना पाणी आले आणि प्रकल्पातही चांगला पाणीसाठा झाला.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfactory water storage due to rains in these three district projects, Nanded news