लग्नाच्या वरातीत गेल्यामुळं दलित तरुणाची निर्घृण हत्या; नवरदेवासह सात जणांना पोलीस कोठडी I Nanded Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Dalit Youth

अक्षयचा भाऊ आकाश श्रावण भालेराव यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Nanded Crime : लग्नाच्या वरातीत गेल्यामुळं दलित तरुणाची निर्घृण हत्या; नवरदेवासह सात जणांना पोलीस कोठडी

नांदेड : बोंढार हवेली (ता. नांदेड) येथे गुरुवारी (ता. एक) रात्री मागासवर्गीय वस्तीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला होता. या वेळी आरोपींनी अक्षय भालेराव या तरुणाची (Dalit Youth) निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती.

या सात जणांना शनिवारी (ता. तीन) दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी सहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. अक्षयचा भाऊ आकाश श्रावण भालेराव यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता. एक) नारायण विश्वनाथ तिडके याचे बामणी या गावात लग्न झाले.

त्यानंतर ती वरात बोंढार हवेली गावात आली. तेव्हा हातात खंजीर, लाठ्या - काठ्या, तलवारी घेऊन वरातीतील लोक नाचत होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या कामाजी तिडके यांच्या दुकानावर आकाश व अक्षय दोघे किराणा साहित्य खरेदी करत होते. त्यावेळी संतोष तिडके हा ओरडून शिवीगाळ करत होता. यावेळी मारहाणीची घटना घडली.

या हल्ल्यात अक्षय भालेरावचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीसांनी त्या दिवशी लग्न झालेला नवरदेव नारायण विश्र्वनाथ तिडके, संतोष संजय तिडके, निळकंठ गणेश तिडके, माधव गोविंद तिडके, कृष्णा गोविंदराव तिडके, दत्ता विश्वनाथ तिडके आणि शिवाजी यशवंत तिडके या सात जणांना अटक केली.

या प्रकरणात फिर्यादीमध्ये असलेल्या अजून काही जणांना पकडणे बाकी आहे. या सर्वांना शनिवारी दुपारनंतर पोलिसांनी न्यायालयात हजर करून घडलेला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता मांडली. सरकारी वकील ॲड. यादव तळेगावकर यांनी मांडलेला युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी या सात जणांना सहा दिवस अर्थात ता. नऊ जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.