खोटे बोलण्याची सुद्धा मर्यादा असते, शंकरअण्णांनी डागली आमदार शिंदेंवर तोफ | Nanded Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shankaranna Dhongade

खोटे बोलण्याची सुद्धा मर्यादा असते, शंकरअण्णांनी डागली आमदार शिंदेंवर तोफ

कंधार (जि.नांदेड) : आपण काय बोलतो आहोत, त्याचे जनमानसात कसे परिणाम होतील, याची जाणीव असायला हवी. निदान लोकप्रतिनिधीने तरी हा प्रोटोकॉल पाळायलाच हवा. परंतू कंधार - लोहाच्या (Kandhar Loha Assmebly Seat) आमदारांनी याकडे दुर्लक्ष करून मतदारसंघात २४ साठवण तलावांना मंजुरी मिळाली व त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपय मंजूर झाल्याचे सरासर चुकीचे व दिशाभूल करणारे वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले आहेत. खोटे बोल पण रेटून बोल, याची प्रचिती त्यांनी आणून दिली, असे स्पष्ट करून माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (Shankaraanna Dhongde) यांनी खोटे बोलण्याची सुद्धा मर्यादा असते, अशा शब्दात आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या वक्तव्याच्या विरोधात तोफ डागली.(Shankaranna Dhongade Criticize MLA Shyasundar Shinde Over Development Politics)

हेही वाचा: आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारताचा मदतीचा हात, देणार ६६७० कोटी

पत्रकारांशी बोलताना धोंडगे म्हणाले की, विद्यमान आमदारांनी पत्रकार परीषद घेऊन या क्षेत्रात नवीन २४ साठवण तलावास मंजूरी मिळाल्याचे जाहीररित्या सांगितले. पण वस्तुस्थिती आज घडीला शासनाकडून एकाही तलावाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. नोव्हेंबर २१ मध्ये गोदावरी महामंडळाने नांदेड (Nanded) जिल्ह्यातील प्रस्तावित ४० सिंचन प्रकल्पासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ४.७९६ टीएमसी पाणी उपलब्धतेला तत्वतः मान्यता दिली आहे. आमदारांनी लगेच दोन हजार हजार कोटी निधी मंजूर झाला आणि २४ साठवण तलाव होणार असल्याचे सांगितले. खरे तर जिल्ह्यातील पाणी उपलब्ध पहाता लोहा - कंधारच्या वाट्याला दोन टीएमसी पाणी येईल. त्याचा हिशोब काढल्यास तीन हजार हेक्टर शेती सिंचन होऊ शकते. पण त्यांनी ५५ हजार हेक्टर हा आकडा कसा काढला कळत नाही. आणि दुसरी बाब म्हणजे कोणताही प्रकल्पाचे सर्वेक्षण अंदाजपत्रके, भुसंपादन, तांत्रीक मान्यता, वैयक्तीक पाणी उपलब्धता नसताना दोन हजार कोटी निधी मंजूर झाला हा जावई शोध कसा लावला हे ही कळत नाही.

हेही वाचा: माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना कोरोनाची लागण, मुलाने दिली माहिती

कंधार-लोहा तालुक्यात लहान-मोठ्या पाझर - साठवण एकूण १६८ साईड आहेत. मागील ३० वर्षापासून त्या त्या विभागाकडे याचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. आमचीही इच्छा या भागात जास्तीत जास्त तलाव व्हावेत व शेती सिंचनखाली यावी अशी आहे. तशी सुरवात ही आम्ही केली होती. पण आताचा जो प्रकार पहाता मागील अडीच वर्षात या भागात सर्व विभाग निरंक असुन सगळीकडे आनागोंदी आहे. विकासा बाबतीत अधिकारी व लोकप्रतिनीधी मनमानी व समन्वय नसल्याचे दिसते. माझी याबाबत बोलायची इच्छा नव्हती पण काहीजण वरील बाब खरी आहे काय, असे प्रश्न करीत आहेत. एक कार्यकर्ता म्हणून मी हा खुलासा करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्ता पवार, मनोहर भोसीकर, शिवदास धर्मापुरीकर, दिलीप धोंडगे, संजय पाटील कऱ्हाळे, ॲड. विजय धोंडगे, शिवराज पाटील धोंडगे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedMarathwada
loading image
go to top