दुकानदारांचा माल न उचलण्याचा निर्णय, काय आहे कारण ? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्स फेडरेशन संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे शॉपकिपर्स फेडरेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार (ता.एक) जूनपासून स्वस्त धान्य न उचलण्याचे तसेच वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड : शासनामार्फत दिले जाणारे स्वस्तधान्य राज्यभरातील सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यासाठी अग्रेसर असलेल्या रास्त भाव दुकानदारांचाही समावेश आहे. परंतु, त्यांना कोरोना योद्धाप्रमाणे कुठलेही विमा संरक्षण दिले गेले नाही. त्यामुळे इतर कोरोना योद्धाप्रमाणे रास्तभाव दुकानदारांना देखील विमा संरक्षण दिले जावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

रुग्णालय, औषधी दुकाने, दूध डेअरी, गॅस वितरण यासह स्वस्त धान्य दुकानदार हे देखील अत्यावश्यक सेवेत मोडतात. कोरोनाच्या लढाईत अग्रस्थानी असणारे डॉक्टर, पोलिस, परिचारिका, आशावर्कर्स, तलाठी व ग्रामसेवक या कोरोना योद्धांना शासनाकडून विमा सरक्षण देण्यात आले आहे. 

हेही वाचा- नृसिंह जिनिंग फॅक्टरीला भीषण आग

 रास्तभाव दुकानदार अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व दुकानदारांना विमा संरक्षण मिळालेच पाहीजे, मानधनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत हालचाल झालीच पाहिजे, या आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे मागणी करुन (ता.एक) जूनपासुन रास्त भाव धान्य दुकानदारांनी राज्यव्यापी धान्य न उचल आणि वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-  मुंबईहून आलेल्या दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह

या आहेत रास्त भाव धान्य दुकानदारांच्या मागण्या
-रास्त भाव धान्य दुकानदारांना आणि दुकानातील सहायकांना (ता.२९) मेच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा सुरक्षा कवच देण्यात यावे 
-प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचे मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्वरित दिले जावे.
-जोपर्यंत कोरोना विषाणूची साथ आहे. तोपर्यंत दुकानदाराचा नॉमिनी म्हणून आधार अधिप्रमाणित करून शिधापत्रिका धारकास अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे. 
-ई-पॉस मशीन चालविताना येत असलेल्या नेटवर्कच्या अडचणी त्वरित दूर कराव्या.
- रास्त भाव दुकानदारांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा आणि वेतन देण्यात यावे.
- शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी. वरिल मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी संघटनेच्या वतिने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे.

आम्हाला विमा संरक्षण हवे
कोरोनाच्या संकटाला न जुमानता शासनाकडून आलेले अन्यधान्य सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम रास्तभाव दुकानदाराकडून सुरु आहे. परंतु, इतर कोरोना योद्धाप्रमाणे आम्हाला कुठलेही विमा संरक्षण दिले गेले नाही. कोरोना योद्धाप्रमाणेच आम्हाला देखील शासनाने विमा संरक्षण दिले जावे.   
-गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्स फेडरेशन संघटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The shopkeeper's decision not to pick up the goods, because of what